अमरनाथ यात्रेनंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि कलम ३५ (ए) हटवल्यानंतर ते केंद्रशासित राज्य करण्यात आले. या घटनेला आता पाच वर्षे झाली आहेत व तेथील जनता आता विधानसभा निवडणूक होण्याची वाट पाहते आहे. त्यांच्यासाठी एक चांगली बातमी असल्याचे संकेत आहेत. सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा संपल्यानंतर विधानसभा निवडणूक घेतली जाण्याची बातमी समोर येते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेतही दिले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची गुरूवारी एक महत्वाची बैठक झाली. त्यात जम्मू काश्मीरमधील अनेक नेतेही सहभागी झाले होते. भाजप राज्यातील सर्व ९० जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू शकते आणि निवडणुकीच्या अगोदर कोणाशी आघाडी करण्याची गरज नसल्याचे या नेत्यांनी सांगितले.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० ऑगस्ट २०१९ मध्ये समाप्त करण्यात आले होते. अगोदर लडाख हा भाग जम्मू काश्मीरमध्येच सामिल करण्यात आला होता. मात्र २०१९ नंतर लडाखला वेगळे राज्य करण्यात आले. तत्पूर्वी २०१८ मध्ये आमदारांची सौदेबाजी होत असल्याच्या संशयावरून तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू काश्मीर विधानसभा भंग केली होती. त्यांच्या निर्णयाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली होती.
आता जम्मू काश्मीर भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुकीत भाजप कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करणार नाही. मात्र पक्षातल्याच सूत्रांच्या म्हणण्यानुसार काही जागांच्या संदर्भात तडजोड करत समविचारी पक्षांशी आघाडी केली जाऊ शकते. १९ ऑगस्ट रोजी अमरनाथ यात्रा समाप्त होणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल तेही जाहीर केले जाणार नाही. मात्र आता निवडणुकीची चाहुल लागली असल्यामुळे राज्यात केंद्रीय नेत्यांच्या दौऱ्यांत वाढ होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील काही प्रमुख योजनांची पायाभरणी आणि लोकार्पण केले जाऊ शकते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपकडून जम्मू काश्मीरमध्ये लवकरच जनसंपर्क अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. तथापि, पक्षाकडून हेही स्पष्ट करण्यात आले आहे भाजपच्या प्रदेश शाखेत कोणतेही फेरबदल केले जाणार नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल असा कयास वर्तवला जातो आहे.





