Shikrapur : जिल्हा बँकेच्या मतदान प्रतिनिधी ठरावावरून मारहाण
Shikrapur : जिल्हा बँकेसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून ठराव द्यायचा असून, तो आमच्या विचारांचा दिला जाणार आहे,’ असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

शिक्रापूर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रतिनिधी देण्याच्या ठरावावरून कासारी (ता. शिरूर) येथे वाद झाल्याची घटना घडली. हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक राजेंद्र रामचंद्र काकडे यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केल्याचा तसेच विरोधातील ठराव दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने मतदान प्रतिनिधी देण्याचा ठराव करण्यासाठी बैठक नियोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी संचालक राजेंद्र काकडे हे गुलाब सातपुते, संदीप रासकर, सुखदेव भुजबळ, बापू नरके व लिलावती रासकर यांच्यासह सोसायटी कार्यालयाकडे जात होते. यावेळी सूरज भुजबळ, आकाश भुजबळ, कृष्णा भुजबळ, विशाल भुजबळ व अमोल भुजबळ यांनी काकडे यांना अडवून, ‘तुम्ही सोसायटीत जायचे नाही.
जिल्हा बँकेसाठी मतदान प्रतिनिधी म्हणून ठराव द्यायचा असून, तो आमच्या विचारांचा दिला जाणार आहे,’ असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. काकडे यांनी हा निर्णय बैठकीत ठरविला जाईल, असे सांगितल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यातून संबंधितांनी शिवीगाळ, दमदाटी करीत काकडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य संचालकांनी मध्यस्थी करून काकडे यांची सुटका केली व त्यांना सोसायटीच्या कार्यालयात नेले.
याबाबत हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक राजेंद्र रामचंद्र काकडे (वय 55, सध्या रा. चैतन्यनगर, धनकवडी, पुणे; मूळ रा. कासारी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरज संभाजी भुजबळ, आकाश दिलीप भुजबळ, कृष्णा मधुकर भुजबळ, विशाल प्रकाश भुजबळ, अमोल कैलास भुजबळ व संभाजी काळूराम भुजबळ (सर्व रा. कासारी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड करीत आहेत.
कार्यालयात येऊन पुन्हा धमकी
काकडे कार्यालयात गेल्यानंतरही संभाजी काळूराम भुजबळ यांच्यासह संबंधित व्यक्ती तेथे आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी पुन्हा शिवीगाळ करून, ‘आमच्या विरोधात ठराव दिला तर तुला जीवे मारून टाकू,’ अशी धमकी दिल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. दरम्यान, सोसायटीचे अध्यक्ष अनिल नवले घटनास्थळी आल्यानंतर उपस्थितांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला.
राजकीय वातावरण तापले
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदान प्रतिनिधीच्या ठरावावरून सुरू झालेल्या वादाला मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे स्वरूप आल्याने या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
हे आहेत प्रमुख इच्छुक उमेदवार…
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरूर तालुका मतदारसंघासाठी माजी आमदार तथा बँकेचे विद्यमान संचालक ड. अशोक पवार, माजी संचालक दिवंगत अरुणआबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निल गायकवाड, माजी उपसभापती राजेंद्र जासूद, माजी सभापती प्रकाश पवार आणि जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले हे प्रमुख इच्छुक असल्याची चर्चा आहे. यापैकी दोघांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील ‘अ’ वर्गातील सुमारे 133 सोसायट्यांच्या ठरावांवर या निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने राहावेत, यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.





