T20 World Cup 2024 : श्रीलंकेचा लाजिरवाणा पराभव, सराव सामन्यातच ठरले उलटफेरचे बळी…

T20 World Cup 2024 (Sri Lanka vs Netherlands) : येत्या 1 जूनपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक 2024 च्या मुख्य सामन्यांपूर्वी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सराव सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेसाठी संघाने किती तयारी केली आहे हे सराव सामन्यांवरून दिसून येते. पण श्रीलंकेकडे पाहता काही विशेष तयारी केल्याचे दिसत नाही. स्पर्धेच्या मुख्य सामन्यांपूर्वी, श्रीलंका संघ नेदरलँड्सविरुद्ध सराव सामना खेळला, परंतु या सामन्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
लॉडरहिल, फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क येथे नेदरलँड्सने श्रीलंकेचा 20 धावांनी पराभव केला. श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 वर्षीय सलामीवीर मायकेल लेविटने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना केला आणि निवृत्त होण्यापूर्वी 28 चेंडूत 54 धावा केल्या. 15 षटकांत 4 बाद 123 अशी धावसंख्या झाल्यानंतर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स क्रीजवर आला.
Excellent success 🤩 Our first T20 World Cup Warm-up Match ends with a 𝘄𝗶𝗻 🆚🇱🇰
Thanks for your enthusiasm 🦁#kncbcricket #nordek #t20worldcup #cricket #srivned #outofthisworld pic.twitter.com/eFKtpiY5V6
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) May 28, 2024
त्याने डेथ ओव्हर्समध्ये 58 धावा जोडल्या आणि 12 चेंडूत 27 धावा केल्या. अशाप्रकारे नेदरलँड्सने 20 षटकांत 5 विकेट गमावत 181 धावा केल्या. श्रीलंकेसाठी दिलशान मदुशंका यांने 4 षटकात 39 धावा देताना 2 गडी बाद केले तर डावखुरा फिरकीपटू ड्युनिथ वेलाल्गेने 4 षटकांत 26 धावा देत एक बळी घेतला.
नेदरलँड्सने दिलेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली आणि 5 षटकांत त्याच्या 2 बाद 14 अशी धावसंख्या होती. त्यानंतर 9 षटकांत त्यांची 5 बाद 54 धावा अशी स्थिती झाली होती. यानंतर श्रीलंकेच्या संघाला शेवटच्या 6 षटकांमध्ये विजयासाठी 55 धावांची गरज होती आणि फक्त 4 विकेट शिल्लक होत्या. पण श्रीलंकेचा डाव 18.5 षटकात 161 धावांवर गडगडला. संघासाठी कर्णधार वानिंदू हसरंगाने 15 चेंडूत 43 धावा केल्या आणि दासुन शनाकाने 20 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी केली.
भारतीय वंशाचा युवा ऑफस्पिनर आर्यन दत्तने घातक गोलंदाजी करत 20 धावांत तीन बळी घेतले. त्यांच्याशिवाय उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज काइल क्लेनने दोन आणि लोगान व्हॅन बीकने एक बळी घेतला.
श्रीलंकेचा संघ 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 3 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने करेल. त्याचवेळी नेदरलँड्सला डलासच्या ग्रँड प्रेरी स्टेडियमवर 4 जून रोजी नेपाळविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. 17 जून रोजी श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे.





