Roshibina Devi Silver : रोशिबिना देवीने वूशूमध्ये रौप्यपदक जिंकत रचला इतिहास! सलग तिसऱ्यांदा आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय
Roshibina Devi Silver : नाओरेम रोशिबिना देवीने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशूच्या ६० किलो सांडा प्रकारात रौप्य पदक जिंकले. सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

Asian Games 2026 Roshibina Devi Wins Silver Medal In Wushu : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताची स्टार वूशू खेळाडू नाओरेम रोशिबिना देवीने (Roshibina Devi) ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले आहे. महिलांच्या ६० किलो सांडा (Sanda) प्रकाराच्या अंतिम फेरीत २५ वर्षीय रोशिबिनाला चीनच्या बलाढ्य झांग शियाओयूविरुद्ध ०-२ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, या रौप्यपदकासह आशियाई क्रीडा स्पर्धेत वूशू क्रीडा प्रकारात सलग तीन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
चीनच्या खेळाडूचे सुवर्ण; फायनलपर्यंत रोशिबिनाचा एकतर्फी धडाका!
अंतिम लढतीत चीनच्या झांगने दोन्ही फेऱ्या ५-० अशा फरकाने जिंकत एकूण १०-० च्या गुणांसह सुवर्णपदक पटकावले. मात्र, अंतिम फेरीपर्यंत रोशिबिनाने प्रतिस्पर्ध्यांना पाणी पाजले होते. उपांत्यपूर्व फेरीत तिने मकाऊच्या चू मॅन सिनचा ५-० असा धुव्वा उडवून किमान कांस्यपदक निश्चित केले होते. त्यानंतर उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या थानिया कुसुमनिंगत्यासचा २-० असा पराभव करत तिने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली होती.
२०१८, २०२३ अन् आता २०२६; पदकांची ऐतिहासिक हॅटट्रिक!
𝐓𝐇𝐑𝐄𝐄-𝐓𝐈𝐌𝐄 𝐀𝐒𝐈𝐀𝐍 𝐆𝐀𝐌𝐄𝐒 𝐌𝐄𝐃𝐀𝐋𝐋𝐈𝐒𝐓! 🥈🥊
Roshibina Devi does it again on the big stage, bagging Silver in the Women’s 60kg Wushu event, adding another Asian Games medal to her collection. 🔥
Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026 LIVE on Sony… pic.twitter.com/APaHJP88uX
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 24, 2026
मणिपूरच्या या रणरागिणीने २०१८ च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत कांस्य, तर २०२३ च्या हांगझोऊ स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. आता नागोयात पुन्हा रौप्य जिंकून तिने पदकांची अभूतपूर्व हॅटट्रिक पूर्ण केली. पदकानंतर बोलताना ती म्हणाली, “आशियाई स्पर्धेत देशासाठी सलग तिसरे पदक जिंकल्याचा मला प्रचंड आनंद आहे. पुढील स्पर्धांमध्ये अधिक कठोर सराव करून पदकाचा रंग बदलून सुवर्ण जिंकणे हेच माझे मुख्य लक्ष्य असेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक; राष्ट्रपतींसह दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा!
Naroem Roshibina Devi vows to work harder after wushu silver.
”This is my third Asian Games medal. I have worked very hard for it.
The challenge was that I had to win the medal this time as well.
All the Indian players and coaches were hoping that I would score a gold. But I… pic.twitter.com/zjUtnhcku1
— News Arena India (@NewsArenaIndia) September 24, 2026
रोशिबिनाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री मनसुख मांडविया आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत, “सलग तीन आशियाई स्पर्धांमध्ये पदके जिंकणे ही देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असून, रोशिबिनाचे धैर्य आणि अविरत मेहनत नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे,” अशा शब्दांत तिचे कौतुक केले.





