Rowing Bronze Medal : पाण्याच्या लाटांवर भारताचा थरार! सतनाम अन् सलमानची कमाल; रोईंगमध्ये पटकावले ऐतिहासिक कांस्यपदक
Rowing Bronze Medal : २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमध्ये भारताला संमिश्र यश मिळाले. सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी डबल स्कल्समध्ये कांस्य पदक जिंकले, तर बलराज पनवार चौथ्या स्थानावर राहिला.

Asian Games 2026 Rowing Satnam Singh Salman Khan Win Bronze Mens Double Sculls : जपानमधील नागरागावा इंटरनॅशनल रेगाटा कोर्सवर सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय रोव्हर्सनी चमकदार कामगिरी करत देशाच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात भारताच्या सतनाम सिंग आणि सलमान खान या जोडीने कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले. भारतीय जोडीने ६ मिनिटे १३.२५ सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. या शर्यतीत चीनच्या जोडीने ६:०९.७७ वेळेसह सुवर्ण, तर उझबेकिस्तानने ६:१०.४९ वेळेसह रौप्यपदक पटकावले.
अखेरच्या ५०० मीटरमध्ये थरार; सतनामचे सलग दुसरे आशियाई पदक!
रेसच्या सुरुवातीला १००० मीटरचे अंतर पूर्ण होईपर्यंत भारतीय जोडी तिसऱ्या क्रमांकावर धावत होती. त्यानंतर अखेरचे ५०० मीटर अंतर शिल्लक असताना सतनाम आणि सलमानने वेग वाढवत थेट दुसरे स्थान गाठले होते. मात्र, शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूंनी जोरदार मुसंडी मारल्याने भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सतनाम सिंगचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे सलग दुसरे पदक ठरले; याआधी २०२३ हांगझोऊ स्पर्धेत त्याने क्वाड्रपल स्कल्समध्येही कांस्य जिंकले होते.
‘टॉप्स’ योजनेचा फायदा अन् भारतीय सैन्यात पदोन्नती; सलमानची भरारी!
🚣 BRONZE FOR TEAM INDIA IN ROWING MEN’S DOUBLE SCULLS
Satnam Singh (TOPS Development) & Salman Khan (TOPS Development) secured the Bronze Medal with a race time of 6:13.25.
A strong podium finish for Indian rowing at Aichi-Nagoya 2026! 🇮🇳#AsianGames2026 #Cheer4Bharat pic.twitter.com/TWem31zLJv
— SAI Media (@Media_SAI) September 24, 2026
उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी असलेल्या सलमान खानला क्रीडा मंत्रालयाच्या ‘टॉप्स’ (TOPS) योजनेतून आधुनिक प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञानाशी संबंधित सुविधा मिळाल्या होत्या. त्यानंतर एशियन रोईंग कपमध्ये पदक जिंकल्याबद्दल त्याला भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदी बढती मिळाली होती. आता आशियाडमध्ये कांस्यपदक पटकावून त्याने सैन्य आणि संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
बलराज पंवारचे कांस्य थोडक्यात हुकले; पदकतालिकेत चौथ्या स्थानावर समाधान!
दुसरीकडे, पुरुषांच्या एकेरी स्कल्स प्रकारात भारताचा बलराज पंवार पदक जिंकण्यापासून अवघ्या काही सेकंदांनी दूर राहिला. एका टप्प्यावर दुसऱ्या स्थानावर धावणाऱ्या बलराजचा वेग अखेरच्या ५०० मीटरमध्ये मंदावला. त्याने ६:५४.८० अशी वेळ नोंदवत चौथे स्थान मिळवले. या प्रकारात चीनने सुवर्ण, उझबेकिस्तानने रौप्य आणि जपानने कांस्यपदक पटकावले.





