India Men Hockey : भारतीय हॉकी संघाने श्रीलंकेचा १६-१ ने उडवला धुव्वा! जुगराजचे ४ गोल, अभिषेक अन् दिलप्रीतची शानदार हॅटट्रिक
India Men Hockey : मंगळवारी झालेल्या पूल 'ए' मधील दुसऱ्या लढतीत भारताने श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा उडवत सलग दुसरा एकतर्फी विजय मिळवला.

Asian Games 2026 India Mens Hockey Team Thrash Sri Lanka 16-1 Jugraj Abhishek Dilpreet Hat Tricks : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या पुरुष हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतीय हॉकी संघाने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत पदकाच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकले आहे. मंगळवारी झालेल्या पूल ‘ए’ मधील दुसऱ्या लढतीत भारताने श्रीलंकेचा १६-१ असा धुव्वा उडवत सलग दुसरा एकतर्फी विजय मिळवला. याआधी भारताने इंडोनेशियाचा १३-१ ने पराभव केला होता. भारताकडून ड्रॅग-फ्लिकर जुगराज सिंगने तब्बल ४ गोल केले, तर अभिषेक आणि दिलप्रीत सिंगने आपापली हॅटट्रिक पूर्ण करत श्रीलंकेची बचावफळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
पाचव्या मिनिटाला खाते उघडले; मध्यांतरापर्यंत भारताकडे ८-० ची आघाडी!
सामन्याच्या पाचव्या मिनिटाला मनदीप सिंगने अभिषेकच्या पासवर भारताचा पहिला गोल केला. त्यानंतर १०व्या मिनिटाला जुगराजने अप्रतिम ड्रॅग-फ्लिकवर आणि ११व्या मिनिटाला अभिषेकने गोल नोंदवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग (१६वे), अभिषेक (१७वे), जुगराज (२२वे) आणि सुखजीत सिंगने (२९वे मिनिट) गोल डागले. ३०व्या मिनिटाला दिलप्रीतने गोल करत पहिल्या हाफअखेर भारताची आघाडी ८-० अशी मजबूत केली.
मैदानावर गोलचा पाऊस; जुगराज, अभिषेक अन् दिलप्रीतचा धमाका!
𝗔 𝗗𝗢𝗠𝗜𝗡𝗔𝗡𝗧 𝗡𝗜𝗚𝗛𝗧 𝗜𝗡 𝗝𝗔𝗣𝗔𝗡! 🇮🇳🔥
Relive the action as the Indian Men’s Team powered past Sri Lanka 16-1 to make it two wins from two at the Asian Games 2026! 🏑💪
Next stop: South Korea on September 24. 🇮🇳⚡#HockeyIndia #IndiaKaGame #AsianGames2026… pic.twitter.com/ckDS6TUzuY
— Hockey India (@TheHockeyIndia) September 22, 2026
दुसऱ्या हाफमध्येही भारताने आक्रमणाचा वेग कायम ठेवला. मनप्रीत सिंह (३१वे), विवेक सागर प्रसाद (३६वे) आणि कर्णधार हरमनप्रीतने (४५वे मिनिट) गोल केले. अभिषेकने (४९वे मिनिट) स्टिकच्या मागच्या बाजूने चेंडू जाळ्यात धाडत हॅटट्रिक साजरी केली. तर जुगराजने (४२वे व ५३वे मिनिट) आपले चार गोल पूर्ण केले. ५५व्या मिनिटाला दिलप्रीतने स्पर्धेतील सलग दुसरी हॅटट्रिक साजरी केली.
श्रीलंकेचा ऐतिहासिक एकमेव गोल; गुरुवारी दक्षिण कोरियाशी टक्कर!
सामन्याच्या ५०व्या मिनिटाला श्रीलंकेच्या सुरेश रत्नायकेने मैदानी गोल केला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताविरुद्ध नोंदवलेला हा श्रीलंकेचा पहिलावहिला गोल ठरला. सलग दोन सामन्यांत मिळून २९ गोल डागणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना गुरुवारी बलाढ्य दक्षिण कोरियाविरुद्ध होणार आहे.





