India Beat Indonesia : भारतीय पुरुष हॉकी संघाने इंडोनेशियाचा १३-१ ने उडवला धुव्वा! दिलप्रीत सिंगने डागले सर्वाधिक गोल
India Beat Indonesia : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील आपल्या सलामीच्या सामन्यात इंडोनेशियाला १३-१ ने पराभूत करून विजयी सुरुवात केली. दिलप्रीत सिंगने चार गोल करत उत्कृष्ट कामगिरी केली.

Asian Games 2026 India Mens Hockey Team Beat Indonesia 13-1 Dilpreet Singh Four Goals : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने गतविजेत्याच्या थाटात आपल्या अभियानाची तुफानी सुरुवात केली आहे. रविवार, २० सप्टेंबर रोजी झालेल्या पूल-ए मधील पहिल्याच लढतीत भारताने इंडोनेशियाचा १३-१ असा धुव्वा उडवत दणदणीत विजय साकारला. संपूर्ण सामन्यावर भारतीय खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. भारताकडून एकूण आठ वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल डागले, ज्यात स्टार फॉरवर्ड दिलप्रीत सिंहने सर्वाधिक ४ गोल नोंदवत विजयाचा पाया रचला.
पहिल्या क्वार्टरमध्ये २-० ची आघाडी; लाकडा आणि अभिषेकची चमक!
भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सहाव्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या पेनल्टी कॉर्नरवरील फ्लिक अडवल्यानंतर मिळालेल्या रिबाऊंडवर शिलानंद लाकडाने सुरेख गोल करत भारताचे खाते उघडले. त्यानंतर १२व्या मिनिटाला अभिषेकने अप्रतिम मैदानी गोल करत पहिल्या क्वार्टरअखेर भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
एकाच मिनिटात दिलप्रीतचे दोन गोल; मध्यांतराला ७-० ने वर्चस्व!
A commanding start to the Asian Games 2026 title defence as the Indian Men’s Team beats Indonesia 13-1! 🏑💪
A statement win to open the campaign! ⚡#HockeyIndia #IndiaKaGame #AsianGames2026 #AichiNagoya2026 pic.twitter.com/H75RlOWFuF
— Hockey India (@TheHockeyIndia) September 20, 2026
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने गोलचा पाऊस पाडला. १८व्या आणि १९व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने लागोपाठ दोन गोल केले. १९व्या मिनिटाला राजिंदर सिंग आणि २१व्या मिनिटाला मनदीप सिंगने चेंडू थेट जाळ्यात धाडला. २८व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत मध्यंतरापर्यंत भारताची आघाडी ७-० अशी मजबूत केली. तिसऱ्या क्वार्टरच्या ३३व्या मिनिटाला इंडोनेशियाचा कर्णधार औलिया अल अर्दने पेनल्टी कॉर्नरवर एकमेव गोल करत गुणसंख्या ७-१ केली.
दिलप्रीतची शानदार हॅटट्रिक; भारताचा १३-१ ने महाविजय!
इंडोनेशियाच्या गोलनंतर भारताने दुप्पट वेगाने आक्रमण केले. ३५व्या मिनिटाला शिलानंदने दुसरा तर ३७व्या मिनिटाला दिलप्रीतने तिसरा गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. सुखजीत सिंग (३८वे व ४८वे मिनिट) आणि जुगराज सिंगने (४७वे मिनिट) गोल नोंदवले. ४९व्या मिनिटाला दिलप्रीतने वैयक्तिक चौथा गोल करत भारताचा १३-१ असा विजय निश्चित केला. आता भारताचा पुढील सामना २२ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे.





