Badminton Asian Games : आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताचे पदक निश्चित! लक्ष्य सेन, सात्विक-चिरागची कमाल; जपानला चारली धूळ
Badminton Asian Games : लक्ष्य सेनच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानला ३-० ने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Asian Games 2026 India Mens Badminton Team Beat Japan 3-0 Semifinal Medal Assured : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक पराक्रम करत देशाचे आणखी एक पदक पक्के केले आहे. पुरुष सांघिक प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने बलाढ्य यजमान जपानचा ३-० असा एकतर्फी धुव्वा उडवत थेट उपांत्य फेरीत (Semifinal) धडक मारली. उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारताचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल ४० वर्षांनंतर सलग दोन स्पर्धांमध्ये सांघिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला असून, गेल्या आशियाडमध्ये भारताने रौप्यपदक पटकावले होते.
लक्ष्य सेनची स्वप्नवत पुनरागमनाची झुंज; सलग सात गुण घेत पहिला विजय!
पहिल्या एकेरीच्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर असलेल्या कोडाई नारोकाचा ११-२१, २१-५, २१-१९ असा पराभव करत भारताचे विजयाचे खाते उघडले. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एका क्षणी लक्ष्य पराभवाच्या छायेत होता. मात्र, कारकिर्दीतील सर्वोत्तम पुनरागमन करत त्याने सलग सात गुण मिळवले आणि रोमहर्षक विजयासह भारताला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
सात्विक-चिराग जोडीचा कोर्टवर धडाका; ५६ मिनिटांच्या थरारात जपान निष्प्रभ!
MEDAL CONFIRMED! 🇮🇳
India advances to the semifinals at the 20th Asian Games with a clean 3-0 sweep against Japan in the Men’s Team quarterfinals!
Onward to the semis! 💪🔥 pic.twitter.com/AjIE5Tmf6W
— BAI Media (@BAI_Media) September 22, 2026
त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी कोर्टवर उतरली. त्यांनी ५६ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या माजी विश्वविजेत्या जोडीला २१-१८, २४-२२ अशा फरकाने नमवले. अत्यंत तणावपूर्ण झालेल्या दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने अप्रतिम संयम दाखवत भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली.
आयुष शेट्टीची विजयी मोहोर; यजमानांना नमवत भारताचे पदक निश्चित!
तिसऱ्या सामन्यात युवा खेळाडू आयुष शेट्टीने कोर्टवर उतरून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या कोकी वातानाबेचा २१-१०, २१-१९ असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. एकाही सामन्यात पराभूत न होता भारताने थेट उपांत्य फेरी गाठत देशवासीयांसाठी आणखी एका पदकावर शिक्कामोर्तब केले.





