Asian Games 2026 : नेमबाजीत भारताचा दबदबा कायम; एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या संघाने पटकावले रौप्यपदक
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या दुसऱ्या (Asian Games 2026) दिवशी भारतीय नेमबाजांनी पदकांचा झंझावात कायम ठेवत देशाच्या खात्यात आणखी एका मौल्यवान पदकाची भर घातली आहे.

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या दुसऱ्या (Asian Games 2026) दिवशी भारतीय नेमबाजांनी पदकांचा झंझावात कायम ठेवत देशाच्या खात्यात आणखी एका मौल्यवान पदकाची भर घातली आहे.
पहिल्या दिवसापासून नेमबाजीच्या मैदानात वर्चस्व गाजवणाऱ्या भारताचे हे स्पर्धेतील (Asian Games 2026) एकूण तिसरे पदक ठरले. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारतीय नेमबाजांनी जबरदस्त एकाग्रता दाखवत थेट रौप्यपदकाला गवसणी घातली. पार्थ माने, रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशु ढिल्लन या युवा त्रिकुटाने एकत्रितपणे अचूक वेध घेत प्रतिस्पर्ध्यांना तगडे आव्हान दिले.
या अटीतटीच्या अंतिम फेरीत भारतीय त्रयीने एकूण १८९०.१ गुणांची नोंद करत दुसरे स्थान पटकावले. यामध्ये रुद्रांक्ष पाटीलने सर्वाधिक ६३१.८ गुणांची कमाई केली, तर हिमांशु ढिल्लनने ६३०.० आणि पार्थ मानेने ६२८.३ गुण नोंदवून भारताचे रौप्यपदक निश्चित केले.
🥈 3RD MEDAL FOR INDIA IN SHOOTING! 🇮🇳🔥
The trio of Rudrankksh Patil, Himanshu Dhillon & Parth Mane wins🥈in the Men’s 10m Air Rifle Team Event! 🎯
🇮🇳 Team Score: 1890.1
Rudrankksh 631.8
Himanshu 630.0
Parth 628.3Rudrankksh & Himanshu also qualify for the Individual Final pic.twitter.com/tbIkYbVkH5
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) September 21, 2026
याच प्रकारात चीनने १८९९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदरसा विनोद या त्रिकुटाने भारतासाठी पहिले रौप्यपदक जिंकून पदकांचे खाते उघडले होते.
सांघिक यशानंतर आता सर्वांचे डोळे व्यक्तिगत पदकांकडे लागले असून मैदानात प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. याच १० मीटर एअर रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशु ढिल्लन यांनी पदकाच्या आशा अधिक पल्लवित केल्या आहेत.
पात्रता फेरीत तिसऱ्या आणि सातव्या स्थानावर राहत दोघांनीही अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश मिळवला आहे, तर पार्थ माने शर्यतीतून बाहेर पडला. सांघिक रौप्यपदक खिशात घातल्यानंतर आता भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता होणाऱ्या या थरारक फायनलमध्ये भारताचा (Asian Games 2026) सुवर्णवेध लागणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.






