Seema Kumari Bronze : सीमा कुमारीने महिलांच्या १० हजार मीटर धावण्यात पटकावले कांस्यपदक; १६ वर्षांनंतर संपला पदकांचा दुष्काळ
Seema Kumari Bronze : हिमाचल प्रदेशची धावपटू सीमा कुमारीने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकून इतिहास रचला.

Asian Games 2026 Seema Kumari Wins Bronze In Womens 10000m Ends 16 Year Wait : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) च्या ॲथलेटिक्स ट्रॅकवरून भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. भारताची लांब पल्ल्याची धावपटू सीमा कुमारीने (Seema Kumari) महिलांच्या १०,००० मीटर शर्यतीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले. या ऐतिहासिक विजयासह सीमाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या या अत्यंत आव्हानात्मक क्रीडा प्रकारातील भारताचा तब्बल १६ वर्षांचा पदकांचा प्रदीर्घ दुष्काळ संपुष्टात आणला आहे.
३२ मिनिटे ५० सेकंदांची वेळ; बहारीनला सुवर्ण तर जपानला रौप्य!
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या अंतिम लढतीत सीमा कुमारीने ३२ मिनिटे ५०.०५ सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावून भारताचा तिरंगा पोडियमवर फडकवला. या शर्यतीत बहारीनच्या विनफ्रेड यावीने ३२:३९.१८ वेळेसह सुवर्णपदक, तर यजमान जपानच्या नोझोमी तनाकाने ३२:४१.५४ वेळेसह रौप्यपदक पटकावले. अखेरच्या क्षणांमध्ये अव्वल दोन स्थानांसाठी अत्यंत तीव्र चुरस रंगली असताना सीमाने संयमाने धावत आपली भक्कम आघाडी कायम ठेवली.
हिमाचलची सुकन्या; कॅलिफोर्नियात नोंदवला होता वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम!
१० जानेवारी २००१ रोजी जन्मलेली सीमा कुमारी हिमाचल प्रदेशची रहिवासी असून, तिने अत्यंत कमी कालावधीत ५,००० व १०,००० मीटर प्रकारात देशाची आघाडीची धावपटू म्हणून लौकिक मिळवला आहे. तिने मार्च २०२६ मध्ये कॅलिफोर्नियातील ‘द टेन’ स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत ३२:०२.४३ अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. तर एप्रिल २०२६ मध्ये तिने ५,००० मीटर शर्यतीतही १५:१६.२० चा सर्वोत्तम वेळेची नोंद केली होती.
वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये रौप्य; राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णाचा धडाका!
सीमाची कारकीर्द आधीपासूनच पदकांनी समृद्ध राहिली आहे. तिने २०२५ च्या एफआयएसयू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ५,००० मीटर प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. याशिवाय २०२४ च्या एशियन क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले होते, तर २०२६ च्या ६५ व्या नॅशनल इंटर-स्टेट सीनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले होते.





