Asian games 2023 : जिम्नॅस्टिकपटू दीपा 21 महिन्यांच्या बंदीनंतर पुनरागमनासाठी सज्ज

नवी दिल्ली :- डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यावर 21 महिन्यांची बंदी लावण्यात आलेली भारताची जागतिक सुवर्णपदक विजेती महिला जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. तिच्यावरील बंदीचा कालावधी येत्या शनिवारी संपत असून त्यानंतर लगेचच ती आशियाई क्रीडा
स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
दीपाने 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत चौथे स्थान पटकावले होते. तिच्यामुळेच जिम्नॅस्टिक हा खेळ भारतात लोकप्रिय झाला होता. मात्र नंतर डोपिंग चाचणीत दोषी आढळल्या मुळे तिच्यावर 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. तिच्यावरच्या बंदीचा कालावधी 10 जुलै रोजी संपणार असल्यामुळे ती 11 आणि 12 जुलै रोजी भुवनेश्वर येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये भाग घेऊ शकणार आहे.
2014 सालच्या ग्लासगोत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने ब्रॉंझपदक मिळवले होते. तसेच हिरोशिमात झालेल्या 2015 सालच्या आशियाई स्पर्धेत दीपाने याच पदकाची पुनरावृत्ती केली होती.
2018 साली तुर्कीत झालेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत दीपाने अव्वल स्थान मिळवले होते. यानंतर सततच्या दुखापतीमुळे तिच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. दुखापतीमुळे ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकली नाही.
इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (आयटीए) घेतलेल्या डोप टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने तिच्यावर 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेच्या प्रतिबंधित यादीत असलेल्या हिझेनामाइनचं सेवन केल्याबद्दल ती दोषी आढळली होती.




