Asian Champions Trophy 2024 : हाॅकी इंडियानं पाचव्यांदा पटकावलं जेतेपद, फायनलमध्ये चीनला हरवून रचला इतिहास…

Asian Champions Trophy 2024 (India vs China, Final) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे आणि आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय हॉकी संघाने चीनचा 1-0 असा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला आहे. यासह भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. चीनने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता, मात्र ते अपयशी ठरले.
पहिले तीन क्वार्टर गोलशून्य राहिल्यानंतर अखेर टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये शानदार गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली, जी शेवटपर्यंत कायम राहिली. भारताकडून जुगराज सिंगने सामन्यातील एकमेव गोल केला. सामन्यातील भारताचा एकमेव गोल 51व्या मिनिटाला झाला, जिथे भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने जुगराजला चेंडू पास केला आणि त्याने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलून शानदार गोल केला. या गोलमुळे भारतीय हॉकी संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.
Congratulations to the Indian Men’s Hockey Team on clinching their record-breaking 5th Asian Champions Trophy title! 🏆🏑
With a hard-fought 1-0 victory over China, India have not only retained their crown from 2023 but also solidified their position as the most successful team… pic.twitter.com/akCC5N6kGv
— Hockey India (@TheHockeyIndia) September 17, 2024
दरम्यान, ऑलिम्पिकनंतर पहिली स्पर्धा खेळणाऱ्या टीम इंडियाने सोमवारी, 16 सप्टेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 4-1 ने दारूण पराभव केला आणि पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारली होती. तर दुसरीकडे दुसऱ्या उपांत्य फेरीत चीननं पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
भारतानं पटकावलं 5 वे जेतेपद…
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय हॉकी संघाचे वर्चस्व राहिले आहे. 2011 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आतापर्यंत सर्वाधिक 5 जेतेपदं जिंकली आहेत. भारताने (2011, 2016, 2018, 2023, 2024) पाच आणि पाकिस्तानने (2012, 2013, 2018) तीन जेतेपद जिंकली आहेत. यामध्ये 2018 मध्ये भारत व पाकिस्तान यांना संयुक्त जेतेपद दिले गेले होते. तर दक्षिण कोरियाने 2021 मध्ये बाजी मारली होती.





