Actress Ashwini Anchwale : अभिनेत्री अश्विनी अंचवले यांना ‘स्व. गोविंद बल्लाळ देवल स्मृती’ पुरस्कार
Ashwini Anchwale : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या 'स्व. गोविंद बल्लाळ देवल स्मृती' पुरस्काराने यंदा शेवगावच्या नवोदित अभिनेत्री अश्विनी अंचवले यांना गौरविण्यात आले आहे.

Ashwini Anchwale : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘स्व. गोविंद बल्लाळ देवल स्मृती’ पुरस्काराने यंदा शेवगावच्या नवोदित अभिनेत्री अश्विनी अंचवले यांना गौरविण्यात आले आहे. प्रायोगिक नाट्य विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्यांनी हा मान पटकावला असून, त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मुंबई येथील यशवंत नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि सतीश लोटके यांच्या हस्ते अश्विनी अंचवले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संदीप दंडवते लिखित ‘अय’ या नाटकातील प्रभावी भूमिकेसाठी अश्विनी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली. अश्विनी या शेवगाव येथील जिल्हा सहकारी बँकेचे दिवंगत शाखाधिकारी दिलीप अंचवले यांच्या कन्या असून, श्रीक्षेत्र वरूरचे मठाधिपती व प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. दिनकर महाराज अंचवले यांच्या नात आहेत.
अश्विनी या बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असून, शालेय जीवनापासूनच त्यांनी विविध बालनाट्यांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेतही त्यांनी विभागीय तसेच अंतिम फेरीत रौप्यपदक मिळविले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शेवगाव नाट्य परिषद शाखेचे प्रा. रमेश भारदे, हरीश भारदे, उमेश घेवरीकर, भाऊ काळे, भगवान राऊत, फिरोज काझी आणि भाऊसाहेब शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.





