Nagar : साठ हजार वस्तीच्या शेवगावात एकही सुलभ शौचालय नाही

शेवगाव : शेवगाव हे सुमारे ६० हजार लोकवस्तीचे, तालुक्याचे ठिकाण आहे.पंचक्रोशीत येथील कापड बाजार, सोन्या-चांदीच्या पेढ्या व घाऊक किराणा मालाची दुकाने प्रसिद्ध आहेत. त्यामुळे खरेदी विक्रीच्या निमित्ताने दूरवरून येणाऱ्या ग्राहकांची शेवगावात सातत्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. साठ हजार वस्तीच्या शेवगावात एकही सुलभ शौचालय नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे मांडली.
तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कार्यालयात, पंचायत समितीत, पोलिस ठाण्यात तसेच न्यायालयात रोजच बाहेर गावचे लोक येत असतात. शेवगावात विविध शाळा,महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय महाविद्यालय असल्याने रोज हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी येत असतात. अशा विविध कारणांनी शेवगाव नगरी रोजच मोठया प्रमाणात वर्दळीने गजबजलेली असते. मात्र, येथे एकही सुलभ स्वच्छतागृह उपलब्ध नाही.
येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.नीरज लांडे पाटील, डॉ कृष्णा देहाउराय, प्रा.नितीन मालानी , जगदीश धूत यांनी वेळोवेळी शेवगाव नगरपरिषदेकडे याबाबत अर्ज, विनंत्या आंदोलनांच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे. मात्र, दुर्दैवाने अद्यापपर्यंत नगरपरिषदेने वा कोणीही या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेऊन यातून गांभिर्याने मार्ग काढला नाही. शेवगाव ग्रामपंचायतीची नगरपरिषद झाल्यानंतर लोकनियुक्त सदस्यांना देखील अशा समाजोपयोगी विकासात्मक कामाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.
त्यानंतर अनेक मुख्याधिकारी आले आणि बदलून गेले, परंतु याविषयी गांभिर्याने कोणीही लक्ष घातले नाही. शेवगाव नगरपरिषदेमध्ये नुकत्याच विजया घाडगे या महिला मुख्याधिकारी रुजू झाल्याने त्या या अडचणीचा गांभीर्याने विचार करतील, अशा अपेक्षा येथील कार्यकर्त्याच्या वाढल्या आहेत. या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी घाडगे यांना समक्ष भेटून चर्चा करून त्यांना सविस्तर निवेदन देत त्यांचे याप्रश्नी लक्ष वेधले आहे. यावेळी डॉ.नीरज लांडे पाटील, अमोल माने, किरण काथवटे, जगदीश मानधने, अभिजित आव्हाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.





