अहमदनगर | शेवगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

शेवगाव – शेवगाव तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. शनिवारी (दि.२४) दुपारी दोनला सुरू झालेला संततधार पाऊस उशिरापर्यंत लागून राहिला. शेतातील पिकात पाणीच पाणी झाले. मागास लागवड झालेली पिके पाण्याखाली गेली. ओढे, नाले वाहते झाले .
काल अखेर कोरडी असलेली तालुक्याची जीवनदायीनी ढोरा नदी आज पहिल्यांदा दुथडी भरून वाहू लागली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश चेके , प्राचार्य रमेश भारदे, रोटरी क्लबच्या सहकार्याने येथील सुर्यकांता नदीची नुकतीच सफाई होऊन खोलीकरण झाल्याने तीही तुडूंब भरून वाहू लागली आहे. या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे.
शेवगाव शहरातील नालेसफाई वेळीच झाली नाही. येथील अनेक नाल्यावर सिमेंट काँक्रीट्ची अतिक्रमणे झाल. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात वाहने अडकली .येथील शोकीन हॉटेल जवळील नाल्याचे पाणी नगर मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने हा रस्ता काही काळ बंद झाला. त्यामुळे नगर मार्गावरील पैठण, बोधेगावकडे जाणारी वाहने गाडगेबाबा चौकातून पंचायत समिती मार्गाने गावातून वळविण्यात आली होती.र शेवगाव बाजार पेठेतील मेन रोडवरही सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने दिवसभर पेठेत शुकशुकाट होता.





