Nagar : शेवगावात वाहतूक कोंडी नित्याची बाब

शेवगाव : शेवगावात वाहतूक कोंडी झाली नाही, असा दिवस जात नाही. सध्या ऊस गळीत हंगामामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी उसाच्या जुगाडाचा ट्रॅक्टर येथील नगर रस्त्यावरील उतारावर रस्त्याच्या मधोमध आडवा झाल्याने तब्बल सहा तास वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. कोंडीत अडकलेल्या वाहनांना वाट काढून देण्यासाठी पोलिसांबरोबर प्रवाशांनी वाहतूक सुरळीत केली. या वाहतूक कोंडीमुळे शेवगावच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मराठवाडयाकडे जाणारी अवजड वाहतूक, प्रवाशी वाहतूक करणारी वाहने, बस, उसांनी भरलेली वाहने यांचा ताण शहरातील वाहतुकीवर झाला आहे. येथील अरुंद रस्ते, दोन्ही बाजूने झालेली अतिक्रमणे, त्यापुढे ग्राहकांची दुचाकी व चारचाकी वाहने, रस्त्यावरच भरणारा बाजार यामुळे दररोज रात्रंदिवस वाहतूक कोंडी होते. क्रांती चौकातून आंबेडकर चौक,गाडगेबाबा चौक, नेवासा रस्ता या रस्त्यावर कायमस्वरुपी वाहतूक कोंडी होत असते .
दुपारी २ वाजता शहरातील आंबेडकर चौकातून क्रांती चौकाकडे जात असलेल्या हार्वेस्टर मशिननेने तोडणी केलेल्या उसाने भरलेल्या जुगाडाच्या टँक्टरला (एम.एच १७ एव्ही.८३६६) उतारावर एका रिक्षावाल्याने कट मारला. त्यामुळे चालकाने अचानक ब्रेक लावल्याने दोन्ही ट्राँल्या टँक्टरवरती आदळल्या. त्यामुळे ट्रँक्टर दुभाजकावर चढल्याने दोन्ही बाजूची वाहने अडकली.
सुदैवाने यावेळी अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र, दुपारी २ पासून रात्री ७ वाजेपर्यंत नगर, पाथर्डी, नेवासा, पैठण रस्त्यांवर तीन ते चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. त्यात आठवडे बाजार व विवाहाची तिथी ही मोठी असल्याने वाहनांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीत मोठी भर पडली. या कोंडीतून वाहने काढताना चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
शहरामध्ये सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे नगरपरिषद व पोलीस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. रस्त्यावर आडव्या झालेल्या ट्रँक्टरमुळे कोंडी होऊन प्रवाशी व नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. कोंडीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करावी .यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
– डॉ. नीरज लांडे





