गटविकास अधिकारी यांची ज्येष्ठ नागरिकांमध्ये मतदान जनजागृती

शेवगाव, (प्रतिनिधी) – शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यासाठी कामाला लागले आहे. येथील गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी आखेगाव रोडवर सायंकाळी फेरफटका मारणाऱ्या ज्येष्ठ, सेवानिवृत नागरिकांना भेटून त्यांना एकत्रित करून प्रबोधन केले.
तालुक्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. परंतु गावागावातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक हे अनेक वेळा मतदानापासून वंचित राहत असल्याचे आढळून आले आहे. ज्येष्ठांना मतदान केंद्रापर्यंत येण्याची प्रेरणा मिळावी म्हणून गटविकास अधिकारी यांनी सायंकाळी ज्येष्ठ नागरिक फिरायला बाहेर पडतात ती एकावेळेस अनेकांना भेटण्याची नामी वेळ साधली. प्रत्येक मताला किंमत आहे हे ते पटवून सांगतात.
त्यांचे विचार ऐकल्यानंतर ज्येष्ठही कोणत्याही स्थितीत मतदान करूच, असे त्यांना आश्वासित करत आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिकाच्या फिरस्ता संघाने या मतदान जनजागृती अभियानात सहभाग नोंदवून रविवारच्या आठवडे बाजारात मतदान जागृती फलक घेऊन जनजागृती रॅली काढण्याचे नियोजन केले. या संघाचे अध्यक्ष राधेश्याम तिवारी त्यासाठी योगदान देत आहेत. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघातील प्रा. प्रभाकर काळे, विष्णू बडे, नंदकिशोर लांडे, रामदयाळ लाहोटी, कचरू सारडा, लक्ष्मण भिसे, सतीश वाणी, प्रा. काकासाहेब लांडे, राजेंद्र साखरे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.





