Ashok saraf : नखाचीही सर त्यांना नाही..! अशोक मामांनी सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होतात.

Sachin pilgaonkar – Ashok saraf : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता सचिन पिळगांवकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होतात. मात्र या ट्रोलिंगवर आता ज्येष्ठ अभिनेते आणि त्यांचे जिवलग मित्र अशोक सराफ यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी ट्रोलर्सवर थेट निशाणा साधत संताप व्यक्त केला. “सचिनने आज जे स्थान मिळवलं आहे, ते फुकट किंवा वारशाने नाही. त्यासाठी त्याने रक्ताचं पाणी केलं आहे,” असं ठामपणे सांगत त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं.
अशोक सराफ पुढे म्हणाले, “लहान वयापासून सचिनने कामाला सुरुवात केली. दिग्दर्शन, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम, संगीत आणि एडिटिंगचं तंत्र सगळं त्याने आत्मसात केलं आहे. त्याला चित्रपटांबद्दल सखोल ज्ञान आहे. त्याच्या ज्ञानावर कुणी बोट ठेवून दाखवेल का?”
ट्रोलिंग हा काहींचा ‘फावल्या वेळेचा छंद’ झाला असल्याची टीकाही त्यांनी केली. “काहीजण टपून बसलेले असतात. एखादं वाक्य मिळालं की ट्रोल करायला सुरुवात. पण ते विसरतात की ज्या व्यक्तीला ट्रोल करतात, त्याच्या पायाच्या नखाचीही सर त्यांना नाही,” अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांचे कान टोचले.
बालकलाकार ते दिग्दर्शक असा बहुआयामी प्रवास….
सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हिंदी चित्रपट हक़ीकत मधील भूमिकेमुळे ते चर्चेत आले. पुढे त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा विविध भूमिकांमध्ये आपली वेगळी छाप पाडली.
मराठीतील गाजलेले चित्रपट :
नवरी मिळे नवऱ्याला
अशी ही बनवाबनवी
आम्ही सातपुते
नवरा माझा नवसाचा
‘अशी ही बनवाबनवी’ हा आजही मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. सचिन यांच्या टायमिंग आणि दिग्दर्शनामुळे हा सिनेमा अजरामर ठरला.
हिंदीतील उल्लेखनीय काम :
गीत गाता चल
बालिका बधू
अंखियों के झरोखों से
याशिवाय त्यांनी दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि रिअॅलिटी शोमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
सचिन पिळगांवकर यांची कारकीर्द पाच दशकांहून अधिक काळाची आहे. अभिनयासोबत दिग्दर्शन, निर्मिती आणि तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास या सगळ्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान मिळवलं आहे.
अशोक सराफ यांच्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा सचिन यांच्या योगदानाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू असलं, तरी त्यांच्या कामाचा आणि अनुभवाचा आदर करणारे चाहते आजही मोठ्या संख्येने आहेत.
हे देखील वाचा….
Rajpal Yadav Bail : मोठी अपडेट.! अभिनेता राजपाल यादव यांना जामीन मंजूर; पण.. घातली ‘ही’ अट






