Ashish Shelar – या जगाला आणि देशाला प्रेरणा देणारे नेतृत्व, कर्तृत्व आणि महापुरुषांची भूमी महाराष्ट्र आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राजगुरुनगर येथे काढले. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘वंदे मातरम’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विवेक अग्रवाल, राज्याचे सचिव किरण कुलकर्णी, खेडचे आमदार बाबाजी काळे, भाजप नेत्या प्रिया पवार, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, नगरसेवक, प्रांत अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलिस उपअधीक्षक अमोल मांडवे, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, जिल्हा परिषद गटनेते विजयसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, राजमाला बुट्टेपाटील, महेंद्र खांडरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मंत्री शेलार म्हणाले, क्रांतिकारकांचे बलिदान आणि योगदान देश कधीही विसरू शकणार नाही. त्या काळात ‘वंदे मातरम’ या घोषणेमध्ये प्रचंड ताकद होती. गीता, आंदोलन आणि सत्याग्रहामध्येही ‘वंदे मातरम्’ हेच प्रेरणास्थान होते. या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यातील 358 तालुक्यांत कौशल्य विकास कार्यक्रम, सामूहिक ‘वंदे मातरम्’ गायन आणि विविध सांस्कृतिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हुतात्मा राजगुरू यांचे बलिदान देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते कधीही विसरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. राजगुरुनगर : क्रांतिकारकांच्या इतिहासावरील छायाचित्र प्रदर्शन पाहताना मंत्री आशिष शेलार, आमदार बाबाजी काळे आदी. आमदार बाबाजी काळे म्हणाले, हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळाच्या राष्ट्रीय स्मारकासाठी अधिवेशनात मांडणी केली होती. 254 कोटींचा आराखडा मंजूर झाला असून 104 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कामे सुरू असली तरी स्मारक परिसरातील संपादनाबाबत निर्णय होत नाही. येथील नागरिकांना योग्य व जास्तीचा मोबदला देणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून या परिसरात व्यवहार झालेले नसल्याने मोबदला अत्यल्प मिळतो, ही बाब सरकारने लक्षात घ्यावी. तसेच ज्योतिर्लिंग भीमाशंकरचा दुसर्या तालुक्यात उल्लेख होत असल्याने खेड तालुक्यात नाराजी आहे. भीमाशंकर विकास आराखड्यात खेड-आंबेगाव असा उल्लेख करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी विवेक अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच क्रांतिकारकांच्या इतिहासावरील छायाचित्र व माहिती प्रदर्शनाला मंत्री आशिष शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली. मंत्री शेलार यांचे आश्वासन हुतात्मा राजगुरू विकास आराखड्याबाबत सभागृहात निवेदन केले असून संपादनाबाबत निर्णय घेतला जाईल. भीमाशंकर आणि खेड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाबाबत चर्चा झाली असून शिखर समितीची मान्यता घेऊन निधीची तरतूद केली जाईल. ही भूमी पावन असून तिचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.