Road Safety : राजगुरुनगर–कनेरसर मार्गावर मृत्यूचा सापळा; भरधाव डंपरमधून रस्ताभर सांडले दगड-मुरूम
Road Safety : नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे रस्ते बनले जीवघेणे; डंपरवर आच्छादन नसल्याने साहित्याची रस्त्यावर गळती.

Road Safety – राजगुरुनगर–कनेरसर मुख्य रस्त्यावर रेटवडी परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणात दगड, गोटे आणि मुरूम थेट रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. अचानक रस्त्यावर सांडलेल्या साहित्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली असून अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
विशेष म्हणजे, ही धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही संबंधित प्रशासनाने तब्बल पाच तासांनी रस्ता साफ केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर–कनेरसर मार्गावर अवैधरित्या मुरूम व दगड वाहतूक करणारे डंपर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनेक डंपर चालक वाहतुकीदरम्यान नियमांचे पालन करत नसल्याने वाहनांमधील साहित्य रस्त्यावर सांडत आहे.
रेटवडी येथे भरधाव डंपरमधून मोठ्या प्रमाणात दगड व मुरूम रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागली. काही वाहनचालक घसरून पडल्याच्या घटनाही घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. या मार्गावर सतत अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर पडलेले दगड व मुरूम तातडीने हटविणे आवश्यक होते.
मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांना जवळपास पाच तास जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. अखेर स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी कर्मचारी पाठवून रस्ता साफ केला. स्थानिक नागरिकांनी अवैध वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच डंपरमधून साहित्य खाली पडू नये यासाठी वाहनांना जाळी अथवा आच्छादन बंधनकारक करावे, अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, खेड तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मुरूम व दगड वाहतुकीकडे महसूल व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
अपघाताची भीती
खेड तालुक्यात सुमारे साडेचारशे हायवा आणि पाचशेहून अधिक ट्रक असल्याचे सांगितले जाते. या वाहनांद्वारे रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात माती व मुरूमाची अवैध वाहतूक केली जात आहे. अनेक वाहनांवर क्रमांक नसल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. भरधाव वेगात धावणाऱ्या या अवजड वाहनांमुळे मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. नंबर नसलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने पोलिस, महसूल विभाग आणि वाहनमालकांमध्ये संगनमत असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.






