Ashadhi Wari: पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! वारी मार्गावर महिला वारकऱ्यांना मिळणार ‘ही’ खास सुविधा
Ashadhi Wari: ९ ते ११ जुलैदरम्यान पुणे शहरात दिवसातून ३ वेळा होणार सार्वजनिक स्वच्छता; कचरा संकलनासाठी दर ५० मीटरवर कंटेनर्स उपलब्ध.

Ashadhi Wari – यंदा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात आगमन होणार असून, दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ११ जुलै रोजी सकाळी पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या कालावधीत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून पालखी मार्गावरील सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छता, क्रॉनिक स्पॉटची साफसफाई आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छता केली जाणार आहे.
प्रत्येक १५ मीटरवर कचरा संकलन
पालखी मार्गावर प्रत्येक ५० मीटर अंतरावर कचरा संकलनासाठी सेवक व कचरा संकलनासाठी कंटेनर उपलब्ध राहतील. ९ ते ११ जुलैदरम्यान क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार पोर्टेबल व फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांची दिवसातून तीन वेळा स्वच्छता केली जाणार आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी, तसेच सार्वजनिक रस्त्यांवर कीटकनाशक व दुर्गंधीनाशक औषधांची फवारणी करण्यात येणार आहे.
सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी जेटिंग मशिनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दोन्ही पालख्यांचा मुक्काम असल्याने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातून किमान १० सफाई सेवक भवानी पेठ क्षेत्रात नियुक्त करण्यात येणार आहेत. पालखी मार्ग पुढे गेल्यानंतर मुक्कामस्थळावरील शाळा, धर्मशाळा, मंदिरे, तसेच संपूर्ण पालखी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महिला वारकऱ्यांच्या सुविधांना प्राधान्य देत पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मुक्कामाच्या शाळांमध्ये शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था केली आहे, तसेच वारी मार्गावर दर १.५ ते २ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी शौचालये व स्नानगृह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पालखी मार्गावर २०० ठिकाणी २ हजार मोबाइल टाॅयलेट उपलब्ध करून दिली जाणार आहेत, तसेच निवडुंगा विठोबा मंदिर, पालखी विठोबा मंदिर (भवानी पेठ) आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारूळे यांनी दिली.





