Palkhi Marg: पालखी मार्गावरील खड्डे चक्क मातीने बुजवले; आषाढी वारीपूर्वी ठेकेदाराचा भोंगळ कारभार उघड
Palkhi Marg: श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भवानीनगर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराचा निकृष्ट कारभार; खड्डे डांबराऐवजी चक्क मातीने बुजवले.

Palkhi Marg – श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील भवानीनगर येथील रस्त्याची गेल्या तीन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. येथील मोठमोठे खड्डे डांबरीकरण करून बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिक वारंवार करत आहेत. मात्र, प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवत दोन दिवसांपूर्वी हे खड्डे चक्क रस्त्याशेजारील माती टाकून बुजवले आहेत. ठेकेदाराचा हा निकृष्ट दर्जाचा आणि भोंगळ कारभार नागरिकांच्या डोळ्यांदेखत सुरू असून यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण तर सोडाच, साधा मुरूमही वापरला गेला नाही. रस्त्याच्या कडेला पडलेल्या ढिगाऱ्यातून माती उचलून या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आली. परिणामी, अवघ्या तिसऱ्याच दिवशी या खड्ड्यांमधील सर्व माती निघून गेली असून, रस्ता पुन्हा ‘जैसे थे’ धोकादायक बनला आहे. यामुळे वाहनचालकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा याच मार्गावरून मार्गस्थ होतो.
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना, प्रशासनाने खड्डे बुजविण्याचा असा फार्स केला आहे. आषाढीपूर्वी हे खड्डे डांबरीकरण करून कायमस्वरूपी बुजवले नाहीत, तर वारकऱ्यांचे हाल होतील. संबंधित विभागाने या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करून तातडीने रस्ता सुस्थितीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी दिला आहे.
तीन वर्षांपासून नागरिकांचे हाल
गेल्या तीन वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडल्यामुळे भवानीनगर भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना दररोज यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या या डोळेझाकपणाविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी अनेकदा आवाज उठवला, मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत.





