Ashadhi Wari: ज्ञानोबा-तुकारामाचा गजर! पंढरपूरहून मानाचे अश्व देहूकडे रवाना; पाहा कुठून होतोय प्रवास
Ashadhi Wari: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रिंगणाचे वैभव असलेले मानाचे अश्व पंढरपूरहून देहूकडे रवाना; ११ दिवसांचा प्रवास सुरू.

Ashadhi Wari – वारकरी संप्रदायातील आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा सोहळा मानला जातो. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण हा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा आणि भक्तिभाव जागवणारा सोहळा असतो. या रिंगण सोहळ्यात सहभागी होणारे मानाचे अश्व पंढरपूरहून देहूकडे रवाना झाले असून, सध्या त्यांचा प्रवास इंदापूर तालुक्यातून सुरू आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील रनेर कुटुंबाच्या अश्वाला संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पिढ्यान् पिढ्या मानाचे स्थान लाभले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते-पाटील यांच्या अश्वालाही रिंगण सोहळ्यात विशेष मान दिला जातो. पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार नामदेव काका गिरम यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानाचे अश्व प्रमुख वारकरी,
टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा माऊली… तुकाराम” या अखंड जयघोषात देहूकडे मार्गस्थ झाले आहेत. पाथरी ते पंढरपूर आणि तेथून देहूपर्यंतचा हा सुमारे अकरा दिवसांचा प्रवास वारकरी भक्तिभावाने आणि उत्साहाने पूर्ण करीत आहेत. या मानाच्या अश्वांच्या दर्शनासाठी मार्गातील गावांमध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, ठिकठिकाणी त्यांचे भक्तिभावाने स्वागत केले जात असल्याचे चोपदार नामदेव काका गिरम यांनी सांगितले.
तर हे अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान च्या दिवशी पोहोचेल असे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार नामदेव महाराज यांनी प्रभातशी बोलताना सांगितले. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे, तर दुसरे गोल रिंगण इंदापूर शहरात पार पडते. या दोन्ही रिंगण सोहळ्यांना लाखो वारकरी आणि भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात.





