Pankaja Munde: आषाढी वारीपूर्वी इंद्रायणी नदीचा प्रश्न ऐरणीवर! मंत्री पंकजा मुंडे यांचे प्रशासनाला कडक निर्देश
Pankaja Munde: लाखो वारकरी देहूत दाखल होणार, नागरिकांचे आरोग्य धोक्यात;" आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.

Pankaja Munde – तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीतील वाढते जलप्रदूषण तसेच उघड्यावर कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाची दखल घेण्यात आली. राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा, देहू शहरच्या वतीने मंत्री मुंडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आणि भाविक देहूत दाखल होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, इंद्रायणी नदीत सांडपाणी मिसळल्याने नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून जलचरांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत. तसेच उघड्यावर कचरा जाळण्याच्या प्रकारांमुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
निवेदन स्वीकारताना मंत्री पंकजा मुंडे यांनी देहूच्या धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्वावर भर देत नदी प्रदूषण आणि कचरा जाळण्याच्या समस्यांवर स्वतः लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी टिळेकर, भाजयुमो देहू-देहूरोड मंडल अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, भाजपा देहू-देहूरोड मंडल उपाध्यक्ष सचिन मराठे, प्रकाश पडवळ आणि वैभव राख उपस्थित होते.





