Rohit Pawar : जगातील सर्वात पहिली कर्जमाफी संत तुकाराम महाराजांनी केली : आमदार रोहित पवारांचं विधान
Rohit Pawar : या रथासाठी लागणारी ११ किलो चांदी आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबीयांच्या वतीने संत तुकाराम महाराज शिळा मंदिर तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या चरणी अर्पण करण्यात आली.

देहू : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अत्याधुनिक आणि आकर्षक असा नवीन चांदीचा पालखी रथ तयार करण्यात येत आहे. या रथासाठी लागणारी ११ किलो चांदी आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबीयांच्या वतीने संत तुकाराम महाराज शिळा मंदिर तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या चरणी अर्पण करण्यात आली.
बुधवारी (दि. १) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही चांदी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे आणि विश्वस्त वैभव महाराज मोरे यांच्याकडे विधीवत सुपूर्त करण्यात आली.
यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, काका रणजीत पवार, काकी शुभांगी पवार, सासरे सतीश मगर, सासू रेखा पवार, पत्नी कुंती पवार, बहीण सई पवार, मुलगा शिवांशू पवार आणि मुलगी आनंदी पवार यांनी सहकुटुंब श्री संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवता निकम, प्रवक्ते शशिकांत वर्पे, विकास लवंडे, आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज दोन्हे, आत्माराम शास्त्री, महिला मावळ तालुका अध्यक्षा रत्नमाला करंडे, देवशेर प्रमुख संदीप शिंदे, युवा अध्यक्ष काळोखे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार रोहित पवार पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले….
आमदार रोहित पवार यांनी यावेळी बोलताना राज्यातील शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्यांवर भाष्य केले. जगातील सर्वात पहिली कर्जमाफी संत तुकाराम महाराजांनी केली असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले. तसेच कर्जमाफीसाठी असलेल्या ७० टक्के अटींमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतील आणि कर्जमाफीच्या अटी शिथिल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बंद करण्यात आलेली पीक विमा योजना पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचे सांगितले. एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी काळात नवीन चेहरे राजकारणात येतील : रोहित पवार
सचिन अहिरे यांच्या पक्ष बदलाच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, “नेत्यांनी वारंवार पक्ष बदलल्यास जनतेचा नेत्यांवरील आणि राजकारणावरील विश्वास कमी होतो. विचार बदलण्याऐवजी केवळ पक्ष बदलण्याची प्रवृत्ती लोकशाहीसाठी योग्य नाही.” तसेच आगामी काळात नवीन चेहरे राजकारणात येतील आणि नवीन नेतृत्वाला संधी मिळेल, असे मोठं वक्तव्य देखील त्यांनी केले.
भविष्यातही हा कायदा होणार नाही : आमदार रोहित पवारांचा मोठा दावा
आमदार-खासदार फोडण्याचे प्रकार सर्वच पक्षांमध्ये होत असल्याची टीका करत त्यांनी यावर सर्व राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. ‘डिलिमिटेशन’ कायद्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, महिला आरक्षणाच्या नावाखाली हा विषय पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो मंजूर झाला नाही. भविष्यातही हा कायदा होणार नाही, असा मोठा दावाही रोहित पवारांनी केला.





