आषाढी वारी 2022: वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अलंकापुरी सज्ज

आळंदी (ज्ञानेश्वर फड) – जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया।। संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. मंगळवारी (दि. 21 जून) सायंकाळी चार वाजता माऊलींच्या पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद प्रशासन, माऊली देवस्थान, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
उद्या (दि. 18) पासून आळंदीत वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल होण्यास सुरुवात होईल; त्याआधी अलंकापुरी भाविक, वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे पायी वारी होऊ शकली नाही; मात्र यंदा निर्बंधमुक्त वारी होणार असून माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी अडीच लाखाहून अधिक भाविक आळंदीत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक चौकात पोलीस मदत केंद्र उभाण्यात आली आहेत. माऊली मंदिरातील प्रस्थानपूर्व कामांना वेग आला आहे. दर्शनबारीचे कामही वेगात सुरु आहे.
ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रस्थान काळात आळंदीत ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ पूर्वपरवानगी घेतलेल्यांनाच ड्रोन वापरण्याची परवानगी असेल. ड्रोनच्या माध्यमातून घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वारीसाठी येणारे भाविक हे ग्रामीण भागातील असतात त्यांना ड्रोन कॅमेरा ज्ञात नसतो. त्यामुळे अचानक ड्रोनद्वारे चित्रिकरण करण्यात आले तर भाविकांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नकारता येत नाही, त्यामुळे ड्रोनच्या वापरावर बंदी असेल, जर कोणी बेकायदा ड्रोन वापरले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकातून जाहीर केली आहे.
इंद्रायणीचे पाणी पिण्यास मनाई
इंद्रायणी नदीतील आणि परिसरातील विहिरीतील पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ते पाणी भांडी घासण्यासाठी व तत्सम अन्य कारणासाठी वापरता येईल. आळंदीतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे नळाचे पाणी वापरावे. पुरुष व स्रियांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोविड संसर्गबाधितांनी वारीला येऊ नये. जर कोणी संसर्गजन्य आढळून आल्यास आळंदी नगरपरिषदेने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
असा असेल पोलीस बंदोबस्त
पोलीस उपायुक्त 2, सहाय्यक पोलीस आयुक्त 7, पोलीस निरीक्षक 42, पोलीस उपनिरीक्षक 180, पोलीस अंमलदार 1100, वाहतूक पोलीस 200, वार्डन 35, होमगार्ड 600, एसआरपीएफ कंपनी 1, एनडीआरएफ पथक 2, बीडीडीएस पथक 2, सीसीटीव्ही कॅमेरे 210, पब्लिक अनाउसिंग सिस्टीम 58.








