Nagar | आषाढी एकादशी हा राज्यातील सर्वात मोठा उत्सव : प्रा.अनुरीता झगडे

नगर, (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी हा राज्यातील सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती परंपरा याची माहिती व्हावी, यासाठी दरवर्षी दिंडीचे आयोजन करण्यात येते, असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे यांनी केले.
हिंदसेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त शाळेचे अध्यक्ष जगदीश झालानी यांच्या मार्गदर्शनानुसार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीची मिरवणूक दादा चौधरी विद्यालय, पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा,नवी पेठ, नेता सुभाष चौक, चितळे रोड नंतर समारोप शाळेत करण्यात आला.
या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल, रुक्मिणी, वारकरी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई अशा विविध वेशभूषा करून सहभाग नोंदविला. याप्रसंगी दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष अनंत देसाई, माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापिका जामगावकर आदींसह शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





