Prasad Vedpathak : ‘पांढऱ्या पट्ट्यां’ विरोधातील गांधीगिरी पडली महागात; प्रसाद वेदपाठकचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद !
घाटकोपरमधील एका सोसायटी परिसरात जैन साध्वींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्याचा व्हिडीओ प्रसाद वेदपाठक यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

Prasad Vedpathak : डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर ‘प्रसाद वेदपाठक’ (Prasad Vedpathak )गेल्या काही दिवसांपासून घाटकोपरमधील तथाकथित ‘पांढऱ्या पट्ट्या’ प्रकरणामुळे चर्चेत आहे.
या वादाला आता नवं वळण मिळालं असून प्रसाद वेदपाठक यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक भावना आणि सार्वजनिक जागांचा वापर या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय? (Prasad Vedpathak)
घाटकोपरमधील एका सोसायटी परिसरात जैन साध्वींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्याचा व्हिडीओ प्रसाद वेदपाठक यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
या व्हिडीओमध्ये त्यांनी सार्वजनिक अथवा सामायिक वापराच्या जागांमध्ये विशिष्ट धार्मिक समुदायासाठी अशा प्रकारे वेगळ्या पट्ट्या आखण्यामागील नियम आणि परवानग्यांबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
“सार्वजनिक रस्त्यांवर किंवा सर्वांसाठी असलेल्या जागांवर अशा प्रकारच्या पट्ट्या काढण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच अशा कृतीमुळे इतर नागरिकांना अडथळा निर्माण होऊ शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले होते.
This is what you get for speaking for what is right… pic.twitter.com/4KG4QeUlck
— Prasad Vedpathak (@prasadvedpathak) June 11, 2026
सोशल मीडियावर वादाची ठिणगी : ( Prasad Vedpathak)
प्रसाद वेदपाठक यांचा व्हिडीओ काही तासांतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर या विषयावर दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. काहींनी प्रसाद यांनी सार्वजनिक हिताचा मुद्दा उपस्थित केल्याचे म्हटले, तर काहींनी त्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.
वाद वाढत असतानाच संबंधित पांढऱ्या पट्ट्यांवर नंतर रंगकाम करण्यात आले. स्वतः प्रसाद वेदपाठक यांनी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत, “माझ्यासाठी हा प्रश्न आता संपला आहे,” अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती.
इन्स्टाग्राम अकाऊंट निलंबित :
दरम्यान, या वादानंतर प्रसाद वेदपाठक यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट निलंबित झाल्याची माहिती समोर आली. त्यांनी यासंदर्भातील स्क्रीनशॉट एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. त्यासोबत, “जे योग्य वाटतं ते बोलल्यानंतर कधी कधी अशी किंमत मोजावी लागते,” अशा आशयाची पोस्टही त्यांनी केली.
प्रसाद वेदपाठक यांची भूमिका :
प्रसाद वेदपाठक यांनी यापूर्वीही या विषयावर बोलताना, स्वतः राहत असलेल्या परिसरात झालेल्या या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले होते.
मात्र त्यांचा उद्देश कोणत्याही समाजाला लक्ष्य करणे नसून, सार्वजनिक जागांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.






