अग्रलेख : आशाजींची अभिनयसाधना

भारतीय चित्रपटक्षेत्रातील मानाचा सर्वोच्च पुरस्कार, अशी ओळख असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना मिळाला असून, त्यामुळे तमाम भारतीयांना आनंदच झाला असेल. आशाजींनी 95 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले असून, 50 वर्षे अभिनयक्षेत्रात त्या कार्यरत आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर एका महिलेस हा पुरस्कार मिळाला असून, या अगोदर आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळाला होता. 1969 मध्ये देविकाराणी या हा पुरस्कार प्रथम मिळवणाऱ्या अभिनेत्री होत्या. त्यानंतर रूबी मायर्स, काननदेवी, दुर्गा खोटे आणि लता मंगेशकर यांना हा पुरस्कार मिळाला.
आशा पारेख या गुजरातेतील महुआ येथील एका मध्यमवर्गीय गुजराथी कुटुंबात जन्मल्या. त्यांचे वडील हिंदू, तर आई मुस्लीम. सामान्यतः गुजराथी नायिका हिंदी चित्रपटांत फारशा दिसल्या नाहीत. शिवाय मराठी माणसाप्रमाणेच गुजराथी कलावंतांचे हिंदी बरे नसल्याचा सर्वसाधारण अनुभव असे. याला ज्या कलावंतांचा अपवाद होता, त्यात आशाजींचा ठळकपणे समावेश करावा लागेल. त्या काळात ज्या मुली उत्कृष्ट नर्तिका म्हणून नावाजल्या गेल्या, त्यांचा फिल्मी दुनियेत सहनायिका, नायिका वा व्हॅम्प म्हणून प्रवेश सुकर होत असे. लहानग्या आशाचे एका कार्यक्रमातील नृत्य बघून, त्याकाळचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांनी 1952 सालच्या “मॉं’ मध्ये आणि 1954 सालच्या “बाप बेटी’ मध्ये तिला बालतारका म्हणून संधी दिली. त्यानंतर सोळाव्या वर्षी चित्रपटांची नायिका होण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु प्रकाश पिक्चर्सचे विजय भट्ट यांनी “गूँज उठी शहनाई’ मध्ये आशाजींऐवजी अमिताची निवड केली.
तुझ्यात स्टार मटेरियल नाही, असे त्यांनी सांगितले; परंतु जिद्द न हरता आशाजी प्रयत्न करत राहिल्या आणि लेखक-दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या “दिल देके देखो’ मधून त्या नायिका बनल्या. “तुमसा नहीं देखा’मुळे शम्मी कपूरचे नाव झाले होते आणि त्याचीच नायिका होण्याचा बहुमान आशाजींना मिळाला. पुढे “तिसरी मंझिल’ सारख्या नासिरजींच्या चित्रपटात शम्मी आणि आशा पारेख यांची जोडी हिट झाली. 1960च्या दशकात जवळजवळ सर्व आघाडीच्या अभिनेत्यांसमवेत आशाजी नायिका म्हणून चमकल्या. नासिरजींच्याच “जब प्यार किसीसे होता है’ मध्ये देव आनंदबरोबरच्या हलक्याफुलक्या प्रसंगांतही त्या कुठे कमी पडल्या नाहीत. मनोजकुमारसोबत “साजन’ या चित्रपटात डान्स स्कूलमध्ये शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थीच्या भूमिकेत आशाजींनी जबरदस्त धमाल आणली होती. त्याच मनोजकुमार निर्मित “उपकार’मध्ये आशाजींची गंभीर भूमिका होती.
धर्मेंद्रसमवेत “आया सावन झूमके’, “आये दिन बहार के’, “मेरा गॉंव मेरा देश’, यासारख्या चित्रपटांतील रोमॅंटिक भूमिकांचे आशाजींनी सोने केले. तर शशी कपूरबरोबरच्या “प्यार का मौसम’ आणि “कन्यादान’ या चित्रपटांतील आशाजींवरील गाणी खूप गाजली. प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांनी मेरा गॉंव… प्रमाणेच दो बदन, चिराग आणि मैं तुलसी तेरे आँगन की यासारख्या अनेक चित्रपटांतून आशाजींना गंभीर भूमिका दिल्या. राजेश खन्नासोबतच्या “आन मिलो सजना’त “अच्छा तो हम चलते हैं’ हे दोघांवरील गाणे जबरदस्त हिट झाले होते. “पगला कहीं का’ या चित्रपटात नायक वेड्यांच्या इस्पितळात दाखल होतो, तेव्हा तेथील डॉक्टरचे काम करणाऱ्या नायिकेची भावावस्था आशाजींनी उत्कटपणे दाखवली. त्याचप्रमाणे गुलशन नंदा यांच्या कादंबरीवरील शक्ती सामंता यांच्या “कटी पतंग’ मध्ये अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीला सामोरी जाणारी असहाय आणि हतबल नायिका म्हणून आशाजी प्रभावी वाटल्या. “पगला कहीं का’ व “कटी पतंग’ या चित्रपटांसाठी त्यांना फिल्म फेअर मिळाले. “कविता से मन को बहलाया जा सकता है, समझाया नहीं जा सकता’ हा त्यांचा “कटी पतंग’ मधील संवाद गाजला होता.
राजेंद्रकुमार हा जसा “ज्युबिली स्टार’ म्हणून गाजला, तसेच आशाजींचे काही चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले आणि काही सुवर्णमहोत्सवी. 1960च्या दशकात शर्मिला टागोर, माला सिन्हा, साधना, नंदा, हेमामालिनी, मुमताज, वहिदा रेहमान अशा अनेक नायिका लोकप्रिय होत्या. तर 1950च्या उत्तरार्धात मधुबाला, वैजयंतीमाला, नर्गिस, मीनाकुमारीसारख्या अभिनेत्री यशोशिखरावर होत्या. अशा काळात चित्रपटसृष्टीत कोणाचीही ओळख नसताना आशा पारेख यांनी स्वतःची एक जागा निर्माण केली. वास्तविक आशाजींकडे सौंदर्य मर्यादितच होते. तरीदेखील नृत्य आणि अभिनयाच्या बळावर त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. अनेक नर्तिका-अभिनेत्री या अभिनयात मठ्ठ असतात, तसे आशाजींबाबत झाले नाही. आशाजींच्या आवाजात एक फेमिनाइन अपील आहे आणि तेच त्यांचे वैशिष्ट्य बनले. एका विशिष्ट वयानंतर त्यांनी “कालिया’ सारख्या चित्रपटातून चरित्र अभिनेत्री म्हणूनही ठसा उमटवला. मात्र चित्रपटक्षेत्रातच अडकून न पडता, आशाजींनी 1990च्या दशकात आपली टीव्ही प्रॉडक्शन कंपनी सुरू केली आणि “ज्योती’ ही गुजराथी टीव्ही सीरियल बनवली. त्यानंतर “पलाश के फूल’, “बाजे पायल’, “कोरा कागज’, “दाल में काला’ यासारख्या टीव्ही सीरियल निर्माण केल्या, सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्षा म्हणूनही आशाजींनी काम केले. त्यावेळी काही चित्रपटांना लावलेल्या कात्रीवरून त्यांना टीकाही सहन करावी लागली.
आशाजींनी सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट्स असोसिएशनच्या कोषाध्यक्ष म्हणूनही प्रभावी काम केले. तसेच रिऍलिटी शोजच्या जज म्हणूनही काम केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आशाजींनी गोरगरिबांसाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून बरेच काम केले. आजही त्या आयुष्य अत्यंत मजेत जगत असून, वहिदा रेहमान, हेलन प्रभृतींचा एक ग्रुप असून, या मैत्रिणी अंदमान-निकोबार असो वा अन्य स्थळे, तेथे सहलीला जातात. एकत्र चित्रपट बघायला जातात किंवा बाहेर हॉटेलात जेवायला जातात. कलावंतांमध्ये नेहमीच ईर्ष्या, स्पर्धा, असूया असते, असे सामान्य प्रेक्षकांना वाटत असते; परंतु त्यांच्यातही चांगले नाते असू शकते आणि सर्वसामान्य माणसाप्रमाणे तेही आयुष्य जगत असतात. आशा पारेख यांना पुरस्कार मिळाल्यानंतर तो सुलोचना किंवा वहिदा रेहमान यांना का मिळाला नाही, अशा प्रकारची शेरेबाजी
समाजमाध्यमांतून वाचायला मिळाली. कोणालाही पुरस्कार मिळाला, की अमुकतमुक व्यक्तींना तो मिळायला हवा होता, अशा प्रकारची भावना व्यक्त केली जाते; परंतु आशा पारेख यांचे करिअर मोठे असून, त्यांनी केलेल्या मुख्य प्रवाहातील अभिनयसाधनेचेही काहीएक मोल आहे. “सायोनारा, सायोनारा’, असे न म्हणता, अविवाहित राहूनही आनंदाने जगणाऱ्या आशा पारेख यांचे फाळके पुरस्काराबद्दल अभिनंदन.





