Mohanlal : अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवणार !

Mohanlal | Dadasaheb Phalke Award – भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा दक्षिणेचे सुपरस्टार मोहनलाल यांना जाहीर करण्यात आला आहे. सिनेमासृष्टीसाठी मोठे योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार मिळवणारे मोहनलाल हे दुसरे मल्याळी कलाकार ठरले आहेत. यापूर्वी अदूर गोपालकृष्णन यांना २००४ साली हा पुरस्कार मिळाला होता. हा प्रतिष्ठीत पुरस्कार येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे.
याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक्सवर एक पोस्ट करून माहिती शेअर केली आहे. मंत्रालयाने म्हटले की, दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने केलेल्या शिफारसीवर घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे की मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ प्रदान केला जाणार आहे.
६५ वर्षीय मोहनलाल हे गेल्या ४५ वर्षांपासून मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. १९८० साली त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी मल्याळम, तमिळ, तेलगू, हिंदी आणि कन्नड भाषेतील ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मोहनलाल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नऊ केरळ राज्य पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. कलेत दिलेल्या योगदानाबद्दल मोहनलाल यांना २००१ मध्ये पद्मश्री आणि २०१९ मध्ये पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, २०२२ च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने मिथून यांना सन्मानित करण्यात आले होते.





