Asha Bhosle : भारतीय संगीतविश्वातील एक युग संपले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांना अगोदर हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अनेक अवयव निकामी झाल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या (Asha Bhosle) जाण्याने बॉलिवूड, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. आशाताईंनी आपल्या आठ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अजरामर गाण्यांमधून त्या कायम आमच्यासोबत राहतील, अशी भावना संपूर्ण देशात व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय आशा भोसले यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलणार आहे. यामुळे आशाताईंची दीर्घकालीन इच्छा पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आशाताईंच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव वाचून दाखवला. asha bhosle मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आशाताईंनी संगीत क्षेत्राशी निगडीत एक संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील ही संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील.” अजरामर वारसा आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत ११ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली. हिंदी, मराठी, बंगालीसह अनेक भाषांमध्ये त्यांनी आपला आवाज दिला. त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी एकूण सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. वर्ष २००० मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. ‘दिल चीज क्या है’, ‘उड़े जब जब जुल्फें तेरी’, ‘इन आँखों की मस्ती’ यासारखी अनेक अजरामर गाणी त्यांच्या स्वरात आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांच्या या अपार योगदानामुळे संगीत क्षेत्रात त्यांना ‘गानसम्राज्ञी’ अशी उपाधी मिळाली होती. आशा भोसले यांच्या निधनाने संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांच्या गाण्यांमधून त्यांचा वारसा कायम राहील, यात शंका नाही. राज्य सरकारच्या निर्णयामुळे आशाताईंच्या स्वप्नातील संगीत संस्था लवकरच प्रत्यक्षात येण्याची आशा निर्माण झाली आहे.