असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा; नवनीत राणांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली मागणी

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर 18 व्या लोकसभेसाठी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. तर, काहींनी हिंदीत शपथ घेतली. मात्र, अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. तर, दुसरीकडे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी घेतलेल्या शपथीवरून मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. त्यांच्या या शपथविधीवरून भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पात्र लिहीत केली ‘ही’ मागणी
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसींच्या शपथविधीवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांना पत्र लिहून असदुद्दीन ओवैसींनी जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेस राणा यांनी आक्षेप घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 102/103 नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.ओवैसी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताना, जय पॅलेस्टाईनचा नार देत आपली शपथ पूर्ण केली होती. त्यामुळे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केला आहे.
कोण आहेत असदुद्दीन ओवैसीं
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना एकूण 6,61,981 मते मिळाली आणि त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा 3,38,087 मतांनी पराभव केला. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत ओवैसी यांनी एकूण 58.95% मतांसह विजय मिळवला होता.





