असदुद्दीन ओवैसी हल्ला प्रकरण; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत करणार निवेदन

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस खास आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर उत्तर देणारे भाषण करणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यसभेमध्ये ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करणार आहेत. एका संकेतस्थळाने याविषयी माहिती दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज राज्यसभेमध्ये ११ वाजून १० मिनिटांनी तर दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी लोकसभेमध्ये ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबारासंदर्भात माहिती देणार आहेत. हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर ३ फेब्रवारी रोजी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा दावा ओवैसी यांनी केला होता. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम टोलनाक्यावरील सीटीटीव्हीमध्ये कैद झालाय. मात्र या हल्ल्यासंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री भाष्य करणार असल्याने ते नक्की काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेले आहे.
या हल्ल्याच्या घटेनंतर ओवैसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली असल्याने त्यावरही गृहमंत्री भाष्य करण्याची शक्यता आहे. केंद्राने दिलेली सुरक्षा नाकारताना लोकसभेत याविषयी ओवैसी यांनी भाष्य केलेले. “माझ्या वाहनावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी. बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींनुसार हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी आणि या देशातील कट्टरतावादाचा अंत करावा,’ असे ओवैसी म्हणाले होते.





