‘जसे पेरतो तसे उगवते, मग आता का वाईट वाटते?’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं शरद पवारांना डिवचलं

Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात काल ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या बंडांनंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला.
त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असणार आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन अजित पवार गटाचे अभिनंदन केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा निर्णय हा न्यायप्रविष्ट झाला होता आणि न्यायालयाने यावर योग्य निर्णय दिला आहे. शेवटी यावर निवडणूक आयोग मॅनेज झाला आहे. या मागे छुपी शक्ती असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत आहे. त्याचा समाचारही मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे.
‘जसे पेरतो तसे उगवते, मागे पवार साहेबांनी तेच केलं. पवार साहेबांनी पक्ष फोडला नव्हता का? पवार साहेब बाहेर पडून मुख्यमंत्री झाले नव्हते का ? ही त्यांची परंपरा आहे मग आता का वाईट वाटते? असा सवाल ही गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.
बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बहुमत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर त्यांचा अधिकार आहे. अजित पवार यांनी २० जून रोजी निवडणूक आयोगात याचिका दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव
आणि निवडणूक चिन्हावर दावा केला होता आणि निवडणूक आयोगासमोर नऊ हजारांहून अधिक कागदपत्रे सादर केली होती. दुसरीकडे शरद पवार यांनी पक्ष सोडलेल्या ९ मंत्र्यांसह ३१ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती.
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
– अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे
– पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील
– दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
– ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले
– उद्या ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचवावे
– पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत
अजित पवारांसोबत कोण?
– महाराष्ट्रातील ४१ आमदार
– नागालँडमधील ७ आमदार
– झारखंड १ आमदार
– लोकसभा खासदार २
– महाराष्ट्र विधानपरिषद ५
– राज्यसभा १
शरद पवारांसोबत कोण?
महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा -३





