जशास तसे! चीनच्या कृतीवर आसामचे मुख्यमंत्री सरमा भडकले; सरकारला केली ‘ही’ विनंती

Himanta Sarma On China| अरूणाचल प्रदेश या भारतीय भूभागावर चीन सातत्याने आपला दावा सांगतो आहे. अलिकडेच त्यांनी अरूणाचलमधील विविध 30 भागांची चीनी भाषेतील नावांची यादी जाहीर केली आहे. यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी संताप व्यक्त केला आहे. शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना सीएम सरमा चीनला जशास तसे उत्तर दिले पाहिजे. चीनने 30 ठिकाणांची नावे बदलली आहेत तर भारताने तिबेट क्षेत्रातील 60 ठिकाणांची नावे बदलली पाहिजेत,’ असे म्हंटले आहे.
ते म्हणाले, “मी यावर भाष्य करू इच्छित नाही कारण हा भारत सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. पण भारत सरकारला माझी विनंती आहे की चीनला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे आणि तिबेटच्या ताब्यात असलेल्या 60 भौगोलिक क्षेत्रांचे नाव बदलावी. अरुणाचल प्रदेश ज्या भागांवर चीन दावा करत आहे ते भारताचे अविभाज्य भाग आहेत. याप्रकरणी भारत सरकारने चीनला चोख प्रत्युत्तर द्यावे.
अरुणाचल प्रदेशात निवडणुका घेण्याच्या निषेधार्थ चीनने अलीकडेच 30 ठिकाणांची नावे बदलली आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशावर चीन अनेक दिवसांपासून दावा करत आहे. मात्र, चीनच्या या कृतींवर भारताने नेहमीच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील 30 ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनचा प्रयत्न फेटाळून लावला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, बनावट नावांचा उल्लेख करून वास्तव बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य आणि अविभाज्य भाग राहील.
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला फटकारले
दरम्यान, याप्रकरणी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी कठोर शब्दांत चीनला फटकारले आहे. चीनने पुन्हा पुन्हा असले प्रकार करणे निरर्थक असल्याचे सांगताना जयशंकर म्हणाले की हा मूर्खपणाचाच प्रकार आहे. अरूणाचल प्रदेश हा भारताचाच भाग आहे आणि भारताचाच राहणार आहे. माझा हा संदेश केवळ देशातीलच नाही तर देशाबाहेरील लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचला असेल.
हेही वाचा :
ठाकरेंसोबत फाटलं पण पवारांना पाठिंबा दिला ; वंचितची ‘या’ जागेवरून माघार





