Artificial Rain In Pune: पुण्यात कृत्रिम पाऊस पाडणार? धरणांनी तळ गाठल्याने महापालिकेचा मोठा प्लॅन…वाचा सविस्तर
Artificial Rain In Pune: देशातील आणि राज्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगांचा अभ्यास करण्याचे आदेश; खर्चासह यशस्वितेच्या दराबाबत आयुक्त सादर करणार सविस्तर अहवाल.

Artificial Rain In Pune :एकीकडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. दुसरीकडे जून महिना संपत आला तरी मोसमी पावसाने दडी मारली आहे. यामुळे शहरावरील पाणीसंकट गंभीर होत असल्याने पावसाची अनिश्चितता लक्षात घेवून आता महापालिकेने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे.
पालिकेच्या सोमवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत कृत्रिम पावसासंदर्भातील संपूर्ण तांत्रिक माहिती तातडीने गोळा करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दिली. सभागृह नेते गणेश बिडकर यावेळी उपस्थित होते. महापौर म्हणाल्या की, सध्या धरणांमध्ये केवळ ३.६० टीएमसी पाणी शिल्लक आहे.
हा साठा पुणेकरांना जेमतेम दोन महिने पुरेल एवढाच आहे. जून महिना संपत आला तरी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाला जोर नाही. त्यामुळे, यंदा धरणे न भरल्यास शहरावर मोठे पाणीसंकट येणार आहे. त्यामुळे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम पाऊस पाडता येईल का, याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली. यापूर्वी राज्यात बारामतीमध्ये असा प्रयोग करण्यात आला होता.
ही बाब लक्षात घेऊन यापूर्वी देशात किंवा राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग कुठे राबविण्यात आले, ते कितपत यशस्वी ठरले, हा प्रयोग करण्यासाठी कोणत्या नामांकित संस्थांची मदत घेता येईल, कृत्रिम पावसाचा यशस्वी होण्याचा दर किती आहे, त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी परिसरात कृत्रिम पाऊस पाडून शहराची पाण्याची गरज भागविता येऊ शकते का, या सर्व मुद्द्यांवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत.
तातडीनं कारवाई करा ..
या बैठकीत महापालिकेने शहरात पाणीबचतीसाठी तातडीनं कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. मागील आठवडयात महापालिकेने शहरात वाॅशिंग सेंटर, जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश काढले होते. तसेच बांधकामांच्या ठिकाणीही पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानंतरही राजरोसपणे पिण्याचे पाणी वापरले जात असल्याने तातडीनं कारवाई करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याचे बिडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.






