प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याने पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक दरेकर यांनी केली आहे.पुणे-नगर महामार्गालगत सणसवाडी गावाची पाणीपुरवठा करणारी जुनी विहीर आहे. सध्या या विहिरीच्या आजूबाजूला आणि विहिरीवरील जाळीवर स्थानिक व्यावसायिक विविध प्रकारचा कचरा आणून टाकत आहेत. विहिरीच्या शेजारीच ओढा असल्याने पावसाचे किंवा साचलेले पाणी कचऱ्यातून झिरपून थेट विहिरीत उतरत आहे, परिणामी पिण्याचे पाणी दूषित होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर पावले उचलावीत, असे दरेकर यांनी म्हटले आहे. “सणसवाडी येथील विहिरीजवळ असलेला कचरा तातडीने उचलण्यात येईल. विहिरीशेजारी साचून राहणाऱ्या सांडपाण्याबाबतचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आला असून, लवकरच हे काम मार्गी लावले जाईल.” – संतोष गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी