लष्कर भरती गैरव्यवहार प्रकरण : लेफ्टनंट कर्नलला जामीन

पुणे – लष्कर भरती लेखी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या लेफ्टनंट जनरल विकास राईजादा यांना विशेष न्यायाधीश जी.जी.भालचंद्र यांनी जामीन मंजुर केला आहे. त्यांनी अॅड. जितेंद्र सावंत, अॅड. संग्राम काटे, अॅड. वैभव मेदणकर आणि अॅड. नम्रता बापट यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
लष्करामध्ये विविध पदांसाठी भरती होणार होती. 8 सप्टेंबर 2021 रोजी लेखी परीक्षा होणार होती. त्या दिवशी सकाळीच विकास यांनी लेखी परीक्षेचा पेपर पत्नीच्या मोबाइलवरून हवालदार सुशांत नाहक यांना पाठविला. त्याने पुढे पाठविला. त्या बदल्यात सुशांतच्या मोबाइलवर युपीआयद्वारे 50 आणि 40 हजार पाठविण्यात आले होते.
त्यानंतर चॅटवरून गुन्ह्यात सहभाग असल्याचे सीबीआयने केलेल्या आरोपात म्हटले आहे. या प्रकरणात विकास यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यांनी गुन्हा केलेला नाही. तपास पूर्ण झाला आहे. त्यांना जामीन देण्याची मागणी अॅड. जितेंद्र सावंत यांनी केली.





