पुणे – उत्कृष्ट स्वयंसेवी संघटनेचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या लक्ष्य स्पोर्ट्सने कोलकाता येथील अमल्गम स्टील या उद्योगाशी सहकार्य करार केला असून ‘प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम’ (Project Grand Slam) या आगळ्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून भारतातील उदयोन्मुख टेनिस खेळाडूंपैकी मुलींच्या गटातून गुणवान खेळाडू शोधून त्यांच्यातून भविष्यात ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अधिकाधिक खेळाडू चमकण्यासाठी दर्जेदार खेळाडू घडविण्याचे आव्हान दोन्ही संस्थांनी स्वीकारले आहे.
लक्ष्यचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव सुंदर अय्यर आणि अमल्गम स्टीलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सौरव मिश्रा यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या प्रकल्पाद्वारे कुमार मुलींच्या गटातील गुणवान टेनिसपटू अगदी तळागाळापासून शोधून काढून त्यांच्यामधून भविष्यात केवळ ग्रँड स्लॅम स्पर्धाच नव्हे, तर जागतिक दर्जाच्या खेळाडू घडविण्याकरिता सर्वतोपरी साहाय्य केले जाणार आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात १४ व १६ वर्षे वयोगटातील माया राजेश्वरन, प्रिशा शिंदे, काश्वी सुनील, ऐश्वर्या जाधव, रिशिता रेड्डी, नैनिका रेड्डी, याशिका शौकीन, सेजल भुतडा व आकृती सोनकुसरे या मुलींची निवड करण्यात आली आहे. ‘प्रोजेक्ट ग्रँड स्लॅम ‘ चा प्रारंभ कोल्हापूर येथे मे महिन्यात झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धामधून करण्यात आला. या वेळी १४ व १६ वर्षांखालील गटातील १५० मुलींमधून पहिल्या टप्यासाठी खेळाडू निवडण्यात आले.
खेळाडूंच्या सध्याच्या आणि मागील कामगिरीच्या आधारे १२ खेळाडूंची पहिल्या टप्प्यासाठी निवड झाली. या खेळाडूंना त्यानंतर क्रीडाविज्ञान तज्ज्ञ आणि प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली पुणे येथे झालेल्या कडक प्रशिक्षण सत्रातून जावे लागले. टेनिससाठी आवश्यक तंदरुस्ती आणि खेळाचे विविधांगी प्रदर्शन करण्याची क्षमता इत्यादी चाचण्यांमधूनही त्यांना जावे लागणार आहे. त्यामध्ये फोरहँड व बॅकहँड फटक्यांचा वेग, सर्व्हिसची भेदकता, फटक्यांची डावपेचात्मक निवड करण्याची क्षमता, मॅच टेम्परामेंट इत्यादी गुणांचा समावेश होता.