रूपगंध: फुलले रे…

माझं घर आणि माझे कॉलेज यात सर्वसाधारणपणे सात-आठ किलोमीटरचे अंतर आहे. डांबरीकरण केलेला गुळगुळीत रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा झाडं आणि मध्ये मध्ये दिसणारी बैठी घरं. शहरीकरणाचा कुठेही लवलेश नसलेला हा भाग आजही मानवाला थंड हवा, सावली आणि भरभरून फळं, फुलं देण्यासाठी सुसज्ज उभा आहे. इथला व्यापक निसर्ग कोणत्याच प्रकारची नकारार्थी भावना तुमच्या मनात येऊ देत नाही. त्यामुळे घरातून निघताना कितीही कंटाळा किंवा अस्वस्थता आणि नकारार्थी भावना असेल तर या छोट्याशा प्रवासात तुम्हाला भेटलेली झाड फुलं उत्साहाचे फवारे फुलवून मनाला कधी ताजेतवाने करतात कळतही नाही.
आज दोन तप उलटले या रस्त्यावर मी प्रवास करतेय, या रस्त्यावरच्या झाडाझुडपां बरोबरच इथला प्रत्येक छोटा मोठा दगडही आपलासा झालाय. कधी कधी तर रस्ता दाखवण्यासाठी चौकात उभे केलेले माइल स्टोनसुद्धा आपल्याला ‘गुड मॉर्निंग’ करत आहेत असाच भास होतो. तो गुळगुळीत रस्ता कधीतरी आपल्याला म्हणत असतो ‘आलीस का ये’.
सकाळी येणारी हवेची झुळूक कानात एखाद्या गाण्याचे बोल बोलून जाते की दिवसभर आपण तेच गाणं गुणगुणत राहतो. लांब वर एखाद्या खोपटाच्या बाहेर उभी केलेली गाय हंबरते तर दाण्याच्या शोधात निघालेल्या चिमण्या चिवचिवतात. पूर्वी जशी असतात तशीच बैठी घरं कायमस्वरूपी रहात नाहीत, तर त्या घरात राहणारी माणसं हळूहळू जशी जमेल तशी ती घर वाढवतात.
कधी दोन खोल्यांना जोडून एखादी खोली बांधतात किंवा छोटेसे दुकान सुरू करण्यासाठी एखादी टपरी बांधतात. असं करत असताना इथल्या लोकांनी या निसर्गाच्या समृद्धीचा र्हास होऊ दिला नाही हे मात्र विशेष. पूर्वी थोडी घर होती आता मात्र खूप घरे झाली आणि त्या घरांबरोबर झाडेही तितकीच वाढली. इतक्या लोकांनी इतकी काळजी केली नसेल पण मी मात्र मनात खूप काळजी करायची. कारण चार पदरी रस्त्याचे काम सगळीकडे चालू होतं. या कामाच्या वेळी इथली मोठी झालेली डेरेदार झाड तोडतील की काय अशी मनात उगीचच भीती वाटायची.
घरातून निघाल्यापासून दोन किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला एक जास्वंदाचे झाड रोज माझं लक्ष वेधून घेत होतं. असंख्य झाडांमध्ये माझं लक्ष त्या जास्वंदाच्या झाडाकडे सारखं जाई. जाता येता मी त्या झाडाला हळूहळू निरखू लागले. त्या झाडाचं वैशिष्ट्य असं की अगदी छोटसं झाड म्हणजे पाच सहा फाद्याचं झाड असेल ते. पण इतकी फुलं यायची त्या झाडावर. लाल जास्वंदाच्या फुलांनी अक्षरशः लगडलेलं असायचं ते झाड. लेकुरवाळ झाड म्हणून मी त्याच्याकडे खूप कौतुकाने पाहायची.
का कुणास ठाऊक पण त्या झाडा जवळून जाताना मला असं वाटायचं की त्यातली प्रत्येक फूल माझ्याकडे बघतंय आणि काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय. कधीतरी निर्जीव वाटणार्या वस्तू पण सजीव माणसांपेक्षाही सजीव भासतात. काही काही परिचित माणसं समोरून येताना हसतसुद्धा नाहीत, मग गुड मॉर्निंग, कसे आहात? अशा पद्धतीची शब्दातीत काळजीसुद्धा त्यांच्या ओठी नसते. माणसांना न हसता न बोलता कसं काय काम करता येतं याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. म्हणजे रोबोट पेक्षाही रोबोट माणूस बनू शकतो?
पुण्यात दोन दिवस रोबोटिक्सच्या संदर्भात वर्कशॉपसाठी मी निघून गेले. वर्कशॉप संपून कॉलेजला जाताना पाहिलं तर काय सगळीकडे खड्डेच खड्डे. दोन्ही बाजूने रस्ता उखडलेला होता. चार पदरी रस्त्याचं काम चाललेलं होतं. मला उगीचच रस्त्याच्या कोपर्यावर असलेल्या त्या जास्वंदीच्या झाडाची आठवण झाली. एवढंसं छोटसं झाड ते कसलं राहतंय, एव्हाना ते कोणीतरी आता उपटून फेकलेही असेल. उगीचच मनात अस्वस्थता निर्माण झाली आणि कॉलेजच्या दिशेने मी वेगाने जाऊ लागले. दोन्ही बाजूने रस्त्याचे काम चाललं होतं. जाता जाता अखेर त्या माझ्या जास्वंदीच्या झाडाजवळ येऊन पोहोचले.
मी त्या झाडापाशी कधीही थांबले नाही, झाडावरचे एकही फूल मी तोडलं नाही, मी त्या झाडाला पाणी घातलं नाही, पण ते झाड माझ्याशी अविरत बोलते आणि मलाही त्या झाडाची उगीचच खूप काळजी वाटते. खणलेल्या रस्त्याच्या कडेला अगदी छोट्या दगडाचा आधार घेऊन ते जास्वंदीचं रोपटे उभं होतं. जमिनीत गेलेली त्या झाडाची मुळेसुद्धा दिसायला लागली होती. त्या झाडाचा आज बहुतेक शेवट होणार, असं असतानासुद्धा आजही ते तेवढ्याच दिमाखात उभं होतं. माझ्या भिरभिरत्या नजरेच्या टप्प्यात ते झाड आलं आणि मला का कुणास ठाऊक उगीच आनंद झाला.
अरे इतकी झाडं रस्त्याच्या कामासाठी तोडली, छोट्या छोट्या रस्त्यावर आलेल्या टपर्या काढण्यात आल्या पण हे झाड मात्र सही सलामत आहे. आजसुद्धा इतकी फुलं अंगावर घेऊन सर्वतोपरी बहरलय. झाडावर उमललेल्या फुलांनी जणू काही मला आनंदाने ‘हाय, कुठे होतीस गं दोन-चार दिवस?’ असाच जणू काही मला प्रन विचारला. आपला आज शेवट ठरेल की उद्या ठरेल हे इतकं निश्चितपणे माहीत असतानासुद्धा इतकी फुलं फुलवत राहायची, हा उदारपणा हा समजूतदारपणा कुठून येतो या झाडांमध्ये? आपण आपलं चांगलं कर्तव्य करत राहायचं असा इतका उदात्त विचार या झाडांना करता येतो का? आणि मग आपण माणसं का शिकत नाहीत यांच्याकडून?
आपण मात्र शब्दाला शब्द पकडून भांडत बसतो पण दुसर्यांना न दुखवता, परोपकाराची भावना मनात ठेवून आपण आपलं आयुष्य सकारात्मकतेने घालवणं, ही खरी काळाची गरज आहे. या जास्वंदीच्या झाडाचं आणि त्यावर लगडलेल्या फुलांकडून हेच मला शिकायला मिळालं की कितीही प्रतिकूल परिस्थिती असो आपण बहरत राहिले पाहिजे, आपण उमलत राहिलं पाहिजे.
माणसाला परमेश्वराने बुद्धी दिली म्हणून कधीकधी तो चुकीचा विचार करतो, चुकीचे निर्णय घेतो आणि आयुष्य संपवतो पण अशा व्यक्तींनी बघा अशा प्रकारच्या रोपट्यांकडे, की ज्याला माहिती आहे हे कन्स्ट्रक्शन वाले कधीही आपल्याला उपटून बाहेर फेकणार आहेत तरी कर्म करत राहणे आणि समाजाला फुलातून लाल रुपी प्रेमाचा संदेश देत राहणे यापेक्षा उदात्त काम काय असू शकतं. त्या दिवसापासून माझे क्षणसुद्धा जास्वंदाच्या त्या रोपट्यासारखे… फुलले रे क्षण माझे फुलले रे…
– डॉ. आश्लेषा मुंगी





