Himachal Assembly Election 2022 : हिमाचलात कॉंग्रेसचे नेतृत्व कोणीही करू शकतो – सुर्जेवाला

शिमला – हिमाचल प्रदेशमध्ये नेतृत्वाची एक नवीन फळी उदयास आली आहे आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही पक्षाचे नेतृत्व करू शकते असे कॉंग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत कॉंग्रेसला हिमाचलात (Himachal Assembly Election 2022) दोन तृतियांश बहुत मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना स्वतःची जागा वाचवण्यातही अडचण येईल असे ते म्हणाले.
सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिग्गज वीरभद्र सिंग यांच्या अनुपस्थितीत कॉंग्रेस प्रथमच हिमाचलातील निवडणुकांना सामोरी जात आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या संभाव्य आव्हानावर भाष्य करताना सुरजेवाला म्हणाले की, बदल हा निसर्गाचा नियम आहे. कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाची नवी फळी आधीच उदयास आली आहे आणि कोणीही पक्षाचे नेतृत्व करू शकतो,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले.
कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणाले की, पक्ष सामूहिक नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या प्रचारातील अनुपस्थिती विषयी विचारले असता ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल तेव्हा राहुल येथे असतील.



