अहमदाबाद – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष (जेडीयू) गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Election 2022) लढवणार आहे. जेडीयूने भारतीय ट्राइबल पक्षाशी (बीटीपी) युती केली आहे. बीटीपीचे संस्थापक छोटूभाई वसावा यांनी युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती दिली. भाजपला सत्तेवरून हटवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नितीश युतीच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये येतील, असेही त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते असणारे वसावा प्रदीर्घ काळ जेडीयूमध्ये होते. काही वर्षे त्यांनी गुजरातमध्ये जेडीयूचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले. मात्र, नितीश यांचा भाजपबरोबर जाण्याचा निर्णय न रूचल्याने त्यांनी 2017 मध्ये जेडीयूला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी बीटीपीची स्थापना केली.
त्या पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये दोन जागा जिंकल्या. बीटीपीने काही महिन्यांपूर्वी आपशी युती केली होती. मात्र, भाजपच्या निर्देशावरून सक्रिय असल्याचा आरोप आपवर करत बीटीपीने ती युती तोडली.
राज्यातील रोजगार मेळाव्यांच्या आयोजनासाठी आता भरीव आर्थिक तरतूद
गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. त्यातील 27 मतदारसंघ आदिवासीबहुल आहेत. त्या जागांवर बीटीपीने प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. बीटीपी आणि जेडीयू नेमक्या किती जागा लढवणार ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.