Himachal : हिमाचलमध्ये पुन्हा ढगफुटी; घरात घुसला चिखल, ४ ऑगस्टपर्यंत धोका!

Himachal – हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये रात्री उशिरा ढगफुटीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला, तर १५ जणांना वाचवण्यात आले आहे. ढगफुटीनंतर चंदीगड-मनाली आणि मंडी-जोगेंद्रनगर चार लेन बंद करण्यात आले आहेत.
मरण पावलेल्यांमध्ये माजी वॉर्ड नगरसेवकाचा जावई-सून आणि नातू यांचा समावेश आहे. एक तीनचाकी वाहन वाचवण्याचा प्रयत्न करत असताना संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्यात अडकले. ढिगाऱ्याखाली गाडल्यामुळे तिघांचाही मृत्यू झाल्याचे मंडीच्या उपजिल्हाधि-यांनी सांगितले.
या प्रकरणाची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर देखील घटनास्थळी पोहोचले. स्थानिक लोकांनी सांगितले की, ढिगारा पडताना पाहताच आम्ही जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. हे दृश्य खूपच भयावह होते आणि काही क्षणातच संपूर्ण परिसर ढिगाऱ्यांनी व्यापला गेला.
२९ ते ४ ऑगस्ट दरम्यान धोका
भारतीय हवामान विभागाने २९ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, २९ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल.
असा आहे पावसाचा अंदाज
पुढील ७ दिवसांत, तामिळनाडू, किनारी आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्येही २९ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल.
तसेच पुढील ७ दिवस महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कोकण आणि सौराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि विदर्भात २९ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अधूनमधून चांगला पाऊस पडेल. या काळात या सर्व राज्यांमध्ये जोरदार वारे, गडगडाटी वादळे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.





