Pune: मतदानासाठी ओळखपत्र म्हणून कोणताही एक पुरावा आवश्यक

पुणे – मतदान करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहे. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीअंतर्गत दि. २० नोव्हेंबर रोजी २१ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे लागणार आहे.
आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड , राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट , छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे.
केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.





