पुणे | माणुसकीच्या विनाशपर्वाने पालकांत अस्वस्थता

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या आठवड्यापासून लहान बालिकांवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, हे प्रकार पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारे आहेत.
आत्ता उघडकीस आलेले अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे बहुतांश गुन्हे प्राथमिक आणि माध्यमात शाळांमध्ये घडले आहेत. त्यामुळे लोकांमधील माणुसकीचे विनाशपर्व सुरू झाले की काय, अशा संतप्त चर्चा लोकांमध्ये सुरू झाल्या आहेत.
मागील आठवड्यात राज्यभरात लहान मुलींवर अत्याचार होण्याच्या जवळपास १७ हून अधिक घटना घडल्याने संबंध पालकवर्गात अस्वस्थता पसरली असून, ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शाळांच्या प्रांगणातही असे प्रकार घडत असल्याने लहान मुलांचे पालक भीतीच्या छायेखाली आहेत.
अगदी मुलांची प्रवासी वाहतूक करणाऱ्यांपासून ते शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्याबद्दलही संशयाचे वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कठोर उपाययोजना करावी, अशीही मागणी होत आहे.
मुंबई येथील बदलापूर शाळेत १३ ऑगस्ट रोजी २ चिमुकल्यांवर अत्याचार झाले. त्यातील एक बालिका अवघ्या चार वर्षांची होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.
ही घटना ताजी असतानाच १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, तसेच आणखी तीन घटना घडल्या. २० ऑगस्टला अकोल्यातील एका शिक्षकाने ६ मुलींचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
याच दिवशी ठाणे येथे एका गतिमंद मुलीवर अत्याचार, तर चांदिवलीमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची राक्षसी घटना घडली. याशिवाय लातूर येथेही साडेचार वर्षांच्या मुलीची लैंगिक छेडछाड करण्यात आली.
नाशिक येथे २१ ऑगस्ट रोजी साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले, तसेच मुंबईतही अल्पवयीन अपंग मुलीवर अत्याचार, तर खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला.
पुण्यात २१ ऑगस्ट रोजी अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने दोन मित्रांनी केला अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली आहे.
२२ ऑगस्ट रोजी नागपुरात आठ वर्षांच्या मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार झाला, तर याच दिवशी कोल्हापुरात दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली.
फाशीचीच मागणी
अवतीभवती घडणाऱ्या या अमानुष घटनांचे तीव्र पडसाद उमटत असून, नागरिक ठिकठिकाणी आंदोलन करत आहेतच; याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या संतापाला वाट करून देत आहेत.
अत्याचार करणाऱ्या नराधमास केवळ फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. याबाबत शासन कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुण्यात बालिकांवर अत्याचारांचे सत्र
१५ ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यातील एका घटनेत अल्पवयीन मुलीला मद्य पाजून अत्याचार करण्यात आले.
ही घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. तर दुसऱ्या एका घटनेत १५ वर्षांच्या पीडितेवर अत्याचार करून तिच्याकडून घरातील २० लाखांचा ऐवज घेण्यात आला,
तसेच शुक्रवारी (दि. २३) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका १६ वर्षांच्या मुलीने २२ वर्षांच्या मुलाविरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार दिली आहे. ही मुलगी झालेल्या अत्याचारातून गर्भवती राहिली आहे.





