पिंपरी : एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघा आरोपींना वाशीम जिल्ह्यातून अटक करत दोन्ही मुलींची सुखरूप सुटका केली. विशाल प्रभाकर समुखराव (वय १९, रा. म्हाळंग्रा, ता. चाकुर, जि. लातूर), विशाल राजू कांबळे (वय १९, रा. पायगुडे नगर, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिखलीतून १९ मे रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी स्वतंत्रपणे दाखल केली होती. दोन्ही मुली मैत्रिणी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना एकत्र फूस लावून पळवून नेल्याचा संशय बळावला होता. तांत्रिक विश्लेषण, सीडीआर आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संबंधित अल्पवयीन मुली आणि आरोपी हे वाशीम येथे असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार सहायक निरीक्षक लक्ष्मण मोगले यांच्या पथकाने २७ मे रोजी वाशीम येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका केली. त्यानंतर आरोपींना चिखली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.