अहमदनगर | अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

राहुरी : राहुरी शहरातून आज सकाळच्या दरम्यान भर बाजारपेठेतून एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. काही तरुणांनी परप्रांतीय आरोपी तरुणाला जागेवरच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेतील ८ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिसरी इयत्तेत शिकत असून ती राहुरी शहरातील मुलनमाथा परिसरात तिच्या कुटुंबासह राहते. ती मुलगी तिचे वडील काम करत असलेल्या दुकानात पैसे आणण्यासाठी गेली होती.
ती पुन्हा घरी जात असताना शहरातील भागीरथीबाई शाळा परिसरात रस्त्याने जात असताना एक परप्रांतीय तरुण तिला म्हणाला की, माझ्याबरोबर चल, मी तुला तुझ्या आईकडे सोडतो. तेव्हा त्या मुलीने नकार दिला असता त्या परप्रांतीय तरुणाने त्या मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने घेऊन जात होता. त्यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला. तेथे असलेल्या एका चहा दुकानासमोर शहरातील काही तरुण चहा पित असताना हा प्रकार त्यांनी पाहिला. त्यांनी मुलीची चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार तरुणांना सांगितला. त्यावेळी तरुणांनी मुलीचे अपहरण करून घेऊन जात असलेल्या तरुणाला विचारले असता त्याने मुका असल्याचे भासवून उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, संतप्त झालेल्या तरुणांनी त्या परप्रांतीय तरुणाची यथेच्छ धुलाई केली.
तेव्हा तो बोलू लागला. दरम्यान त्याने चार ते पाच वेळा मोठ्याने शिट्टी मारली. जणूकाही त्याने आपल्या साथीदारांना इशारा दिला. त्यानंतर तरुणांनी त्याला पकडून राहुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. आज गणेशोत्सव सुरू होत असताना बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. एवढ्या गर्दीच्या ठिकाणाहून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे तालुक्यातील पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.





