मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या “सत्ते पे सत्ता’ या सुपरहिट चित्रपटाच्या रीमेकबाबत चित्रपटसृष्टीत काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. फराह खान आणि रोहित शेट्टी यांनी एकत्रितपणे बिग बजेट चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या चित्रपटाच्या रीमेकच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या चित्रपटातील कलाकार अद्याप निश्चित झालेले नाहीत.
या चित्रपटातील मुख्य भूमिकांसाठी स्टार कलाकारांशी बोलणी सुरू आहे. यासाठी अनुष्का शर्मासोबत संपर्क साधण्यात आला आहे. पण अनुष्काने अद्याप याला दुजोरा दिला नसून निर्मात्यांसोबत तिची बोलणी सुरू आहे. यापूर्वी कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोण यांचीही नावे आघाडीवर होती.
तसेच चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेसाठी शाहरुख खान, अक्षय कुमार आणि रितिक रोशन यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. परंतु काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिक रोशन म्हणाला होत की, मी अमिताभ बच्चन यांचा चाहता असून त्यांची भूमिका साकारण्यास मिळाली तर ती आनंदाने स्वीकारेन.
दरम्यान, अनुष्का शर्मा ही आनंद एल राय यांच्या “झिरो’ चित्रपटात झळकली होती. यात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि शाहरुख खान यांची मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सध्या अनुष्का आपला पती विराट कोहली याच्यासोबत सुटीचा आनंद लुटत आहे.