Anura Kumara Dissanayake : श्रीलंकेचे नवीन अध्यक्ष येणार भारत भेटीवर

कोलंबो – श्रीलंकेचे नवीन अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून नोव्हेंबर महिन्यानंतर भारतभेटीवर येणार आहेत. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ यांनी मंगळवारी ही माहीती दिली.
श्रीलंकेतल्या संदीय निवडणुका झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन केले जाईल. त्यानंतर अध्यक्ष दिसानायके यांच्या भारत भेटीचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
श्रीलंकेतल्या संसदीय निवडणुकीसाठी १४ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक १० महिने आगोदरच होणार आहे. अध्यक्षीय निवडणुकीमध्ये २१ सप्टेंबर रोजी विजयी झालेले दिसानायके श्रीलंकेचे नवीन अध्यक्ष झाले आहेत.
या निवडणुकांनंतर श्रीलंकेचा दौरा करून दिसानायके यांची भेट घेणारे एस. जयशंकर हे पहिले विदेशी उच्चपदस्थ नेते होते. अध्यक्षपदी निवडले गेल्याबद्दल जयशंकर यांनी दिसानायके यांना पंतप्रधान मोदींच्यावतीने शुभेच्छाही दिल्या होत्या.
या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये दिसानायके यांनी विरोधी पक्षनेते म्हणून दिल्लीला भेट दिली होती. दिसानायके यांच्या मार्क्सवादी जनथा विमुक्त पेरामुना या पक्षाने १९८७ ते ९० या कालावधीमध्ये श्रीलंकेत भारतविरोधी चळवळ केली होती. या चळवळीदरम्यान मोठा हिंसाचार देखील झाला होता.





