पुण्यात आणखी एक हुंडाबळीचा प्रकार उघड

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजत असतानाच शहरातील लोहगाव परिसरात सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने झुरळ मारण्याचे औषध पीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नवरा, सासू आणि दीर यांच्याविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. २३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरा अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार अशी आरोपींची नावे आहेत.
विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे पती अजय याच्याशी २२ मे २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नाच्या ६ महिन्यानंतर अजयने घरगुती कारणावरून बायकोला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर सासूने तिला ‘तू माहेरून काय आणलेस तुझ्या आई-बापाकडून काही मिळत नाही, तुमची लायकी नाही’ असे टोमणे मारण्यास सुरुवात केली. तर नवऱ्याने निष्ठूरतेचा कळस करीत विवाहितेला ‘मी तुझ्याशी टाईमपास केला, आता मेलीस तरी चालेल, मला चारचाकी देण्यास तुझ्या बापाला सांग’ असे म्हणत कारची मागणी केली. त्याला विवाहितेने नकार देताच, नवऱ्याने गळा दाबून, मारहाण केली.
हा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने २२ मे रोजी झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विवाहितेवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिने स्वत: पोलिस ठाण्यात येत तक्रार दिली. त्यानुसार सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार नीलेश साळवे करीत आहेत.





